माझ्या ‘Expression’ ला सुरू करण्यापूर्वी , तुम्हाला एक प्रश्न कदाचित पडला असेल की या Expression ला नाव का नाही? म्हणजे कोणी लिहिलंय हे सगळ्यांना का दाखवलं नाही? तर त्याचं उत्तर तुम्हाला Expression मधील घटना वाचत असताना आणि संपल्यावर नक्कीच मिळेल. अजुन एक म्हणजे, खाली लिहिलेल्यापैकी अनेक घटना कदाचित तुम्हाला काल्पनिक वाटतील आणि ते वाटणं साहजिकच आहे कारण माझ्या घरच्यांना आणि मलाही याबद्दल आश्चर्यच वाटतं. पण यातला एकही शब्द काल्पनिक नाही. तसं असतं तर माझ्यासारख्या ‘शून्या’ चं ‘Expression’ या ‘AstroMediComp’ वर आलंच नसतं.
तर सुरवात करतो….
गोखले सर माझ्या आयुष्यात 2010 साली म्हणजे 5 वर्षापूर्वी आले पण फक्त ऐकीव रूपात. साक्षात दर्शन झालं खूप उशिरा 2014 ला. म्हणजे 2010 ते 2014 ते माझ्या आयुष्यात होते, पण द्रोणाचार्यांसारखे. (शिष्याचा अंगठा कापून घेणारे द्रोणाचार्य नव्हे, तर एखाद्याच्या आयुष्यात फक्त अस्तित्वाने प्रकाश आणणारे द्रोणाचार्य). काय आणि कसं झालं सांगतो.
मी आमच्या भागामधे एका बर्या कॉलेज मधे BCS केलं (CET मधे कमी मार्क्स पडल्यावर लोक म्हणतात BCS करावं). जे केलं ते रडत खडत म्हणजे काठावर पास होत, backlogs ठेवत, कॉप्या वगैरे करत. दर आठवड्याला एखादा पिक्चर बघायचा, इकडे तिकडे भटकायचं यात दिवस घालवले. (माझं Love Marriage आहे, त्याची सुरवात पण तिथूनच झाली म्हणजेच त्यातही बराच वेळ घालवला ,अगदी सर म्हणतात तसं ‘Passionately’, असो) म्हणजेच काय तर BCS ला admission घेऊन आपल्याला पुढे काय करायचंय याचा कुठलाही पत्ता नव्हता. पुढचं सोडा, ‘IT’ या क्षेत्रात नेमकं काय करतात हे तेव्हा माहीत नव्हतं, त्या क्षेत्रात आपल्याला job करायचा असतो हे माहीत नव्हतं. तिथे C, C++ वगैरे languages मधे ‘programming’ करायचं असतं हे माहीत नव्हतं, सांगणारं कोणी नव्हतं. (जर कोणाला असं वाटत असेल की कॉलेज ने हे सगळं सांगितलं नाही का? तर मला वाटतं हा प्रश्नच invalid आहे atleast BCS पुरता. कारण तिथे ‘C’ FY ला आणि त्याची ‘Toolchain’ TY ला शिकवली जाते. आणि तरीही कॉलेज ने सांगीतलंच तरी ते ऐकायला आम्ही कॉलेज मधे असायला पाहिजे ना? पुन्हा असो) आणि त्यामुळे C, C++ या दैवी languages मी 8 वी, 9 वी च्या इंग्लीश-मराठी सारख्या शिकलो (म्हणजे पेपर झाल्यावर त्यांचा, आपला काय संबंध? या अविर्भावात) याचा परिणाम जो व्हायचा होता तोच झाला. BCS चा माझा result असा लागला.
C – 34/80 (Passing – 32)
C++ – 16/40 (Passing – 16)
Data Structures – 11/40 म्हणजेच Backlog (Passing – 16), आणि दुसर्यांदा 16/40 (काठावर पास).
बरं, तरीही या सर्वांची लाज नाही वाटली. कारण यावर आपलं भवितव्य अवलंबुन आहे हे माहीतच नव्हतं. TY ला project (उचललेला) आणि practicals चे मार्क(कॉपी केलेले) यांनी तारलं आणि पास झालो. आता confusion, MCS(2 वर्ष) की MCA(3 वर्ष). असंही, लवकर शिक्षण पूर्ण करून काय करणार होतो आणि कुठल्यातरी बाजूला ठाम असावं म्हणून MCA करायचं ठरलं, खरं तर BCS चा portion MCA च्या FY ला पुन्हा असतो, तेवढंच जरा सोप्प जाईल(??) हे पण एक कारण .(अस वाटलंच कसं तेव्हा हे मला आत्ताही नाही कळत).
मग बाकीच्या मित्रांबरोबर आमच्या कॉलेज ची आणि पुण्यातल्या एका नामवंत कॉलेज ची MCA ची entrance exam दिली. आणि पुण्यातल्या त्या कॉलेज ची entrance exam पास झालो.(तो पूर्णपणे मटका होता, Maths च्या सगळ्या 20 questions ला ‘c’ हाच option लिहिला होता). त्या कॉलेज मधे शेवटून दुसरं admission भेटलं.
MCA-FY(2010) ला असताना ‘Railway Station’ ला जुन्या कॉलेज ची एक मैत्रीण भेटली आणि गोखले सरांचा माझ्या आयुष्यात ‘पहिला’ प्रवेश झाला. तिने बोलता बोलता मला सरांविषयी सांगितलं, ती सरांची student नव्हती म्हणजे तिने जे ऐकलं होतं बाहेरून, ते ती मला सांगत होती. मला एवढं कळालं की असा असा एक कोणीतरी ग्रेट माणूस चांगलं शिकवतो, 4 च तास झोपतो वगैरे वगैरे अनेक गोष्टी समजल्या (Astro आणि Medi तेव्हा कळालं नव्हतं, फक्त Comp समजलं). त्या दिवशी एका न पाहिलेल्या व्यक्तीविषयी मनात आदर निर्माण झाला. मात्र त्या व्यक्तीकडे शिकायला आपण पण जावं कधीतरी अशी इच्छा मनात नाही आली, तसा विचार पण तेव्हा नाही आला. कारण तशी शिक्षणाबद्दलची मानसिकताच अजुन तयार झाली नव्हती, अजुनही मी माझ्याच दुनियेत होतो. तुम्हाला खोटं वाटेल, मला viva ला question विचारला होता की ‘structure हा कुठला datatype आहे?’ मला हे ही माहीत नव्हतं की structure ‘datatype’ आहे पण question च तसा असल्यामुळे हे कळालं की structure ‘datatype’ आहे पण मी उत्तर दिलं होतं ‘माहीत नाही’. आणि ती viva होती MCA ची, म्हणजे मी C language दोनदा शिकूनही मला हे येत नव्हतं. असो, तर त्या मैत्रिणीशी बोलताना न पाहिलेले सर माझ्या आयुष्यात आदराने आले आणि फक्त आले. पुढची काही वर्ष काहीच झालं नाही.
पुण्यात शिकायला आल्यावर अभ्यासाची maturity यायला लागली होती. कारण पुण्यात शिक्षणाबद्दलची जागृती बरीच होती. MCA ला आम्हाला WIN32-SDK विषय होता (2011). त्या विषयासाठी वर्गातल्या काही मुलांनी क्लास लावला. तो क्लास म्हणजे ‘गोखले सरांचा क्लास’ हे जेव्हा मला कळालं तेव्हा माझ्या डोक्यात ‘त्या’ मैत्रिणीने सांगितलेलं सगळं पुन्हा आलं आणि मला पण क्लास लावायचाय असं मी त्या मुलांना सांगितलं पण ‘admissions full’ असं कळलं. म्हणजे माझी ती संधी गेली. नंतर UNIX च्या बाबतीत (2012) ही हेच झालं. तेव्हा मला खरं तर खूप उशिरा कळालं होतं आणि तरीही चुक माझीच होती कारण उशिरा कळूनही मी थोडा निवांत राहिलो. आणि batch full झाली. ती पण संधी गेली. म्हणजे आता सरांचा क्लास लावण्याचा संबंध संपला असं वाटलं कारण एकदा कॉलेज संपल्यावर कोणी क्लास का करेल? असं तेव्हा वाटायचं. आणि म्हणून मी सरांचा नाद सोडला.
SY Second Semester (2013) ला असताना ‘placement’ चं वादळ आलं. चर्चा व्हायला लागल्या. मी त्यात कुठेच नव्हतो. कसा असणार? अजूनही “ ‘if’ च्या खालचा सगळा code हा ‘if’ चाच असतो जोपर्यंत ‘else’ येत नाही तोपर्यंत” असं मानणारा मी कसा काय या वादळात अडकणार? आपण आपलं बाजूला राहिलेलं बरं. (‘else’ पुढे आलाच नाही तर? असा प्रश्न पडण्याइतकीही अक्कल नव्हती) वाचून हसायला येत असेल ना? मला ही येतंय पण लाजिरवाणं. आता प्रचंड लाज वाटते पण दुर्दैवाने तेव्हा वाटत नव्हती. निघालीच आहे लाज तर MCA चे marks पण सांगून टाकतो.
C – 40/100 (Passing – 40)
C++ – 54/100 (Passing – 40)
Data Structures – 49/100 (Passing -40)
असो, placement चं वादळ अजुन जवळ येत असतानाच, कोणीतरी ‘पियुष सर’ असा मुलगा placement साठीचे क्लासेस घेतो असं मुलांकडून कळलं. हे ज्याने आम्हाला सांगितलं त्याला माझा मित्र असं बोलला होता की ‘कोण पियुष?’, ‘असले placement चे कुठे क्लासेस असतात का?’, ’जे आम्ही 6 वर्षात नाही शिकलो ते तो आम्हाला 4 महिन्यात शिकवणार का?’ आणि हे सगळं मला ही पटलं तेव्हा. (हे लिहिताना पण त्रास होतोय आता, पण तेव्हा बोलताना नाही झाला). हे बोलल्यावर मुलांनी हे सांगितलं की ‘पियुष हा गोखले सरांचा विद्यार्थी आहे’, आणि त्या दिवशी गोखले सर आयुष्यात पुन्हा आले. मी पियुष सरांचा क्लास लावला.
आता सगळंच वेगळं घडलं, खूप आहे पण छोटं करून सांगतोय.
मी पियुष सरांकडे ‘Pre-Placement’ ची बॅच लावली(2013). त्याच्या पहिल्या lecture ला सरांनी ‘Toolchain’ शिकवली. तेव्हा पहिल्यांदा कळलं की C language मधे लिहिलेला एखादा program नक्की काय करतो. नंतर HARDDISK, RAM बद्दल कळलं. त्या दिवशी मला toolchain ने अक्षरक्ष: वेड लावलं. आयुष्यात पहिल्यांदा मला अभ्यासाबद्दलचे प्रश्न पडायला लागले कारण मी विचार करायला लागलो. मला सगळंच आवडायला लागलं, सरांनी ‘C’ साठीचं पुस्तक सांगितलं ‘Programming in C by Ajay Mittal’. मी ते वाचायला घेतलं. मी ‘C’ खरच तेव्हा पहिल्यांदा करत होतो. मला ‘C’ प्रचंड आवडलं. मला ‘C’ ने झपाटलेलं असतानाच एक आयुष्याला वळण देणारी घटना घडली.
कॉलेज नामांकित असल्यामुळे placement साठी कंपन्यांची कमी नव्हती. पण criteria मधे बसत नव्हतो. त्यातही माझी एका ‘No criteria’ वाल्या PHP च्या कंपनी मधे placement झाली (कंपनी आता बंद पडली). मला PHP पण येत नव्हतं. Interview मधे मला hobbies विचारल्या, मी ‘Reading books’ सांगितलं. त्यांनी मला पुस्तकांविषयी विचारलं. मी त्यांना ‘छावा – शिवाजी सावंत’ पूर्ण सांगितलं हिंदी मधून. त्यांना मी सांगितलेली ‘छावा’ कादंबरी आवडली आणि माझी placement झाली. मला अजूनही हसायला येतं त्या interview विषयी. आणि मी तरीही ती कंपनी join केली, त्याची कारणं अनेक होती, त्यातल महत्वाचं कारण असं की मला माझ्यावर विश्वास नव्हता.
कंपनी ने आधी सांगितलं होतं की PHP मधे ‘development’ चं काम मिळेल पण दिलं मात्र WordPress वर वेबसाइट चा UI बनवण्याचं काम. माझा ‘C’ चा अभ्यास आणि सरांचा क्लास चालूच होता. मी ‘C’ मधे बुडत चाललो होतो, जस जसा ‘C’ बद्दलचा आणि स्वता:बद्दलचा विश्वास वाढत चालला होता तस तसा मी कंपनी मधे अस्वस्थ होत चाललो होतो. कारण कंपनी चं काम म्हणजे Photoshop software वापरल्यासारखं काम होतं. मी ते उत्तम करत होतो. माझं कौतुकही होत होतं. कॉलेज मधेही कंपनी ने माझ्या कामाविषयी सांगितलं होतं. पण मी खुश नव्हतो. दिवसा दिवसाला ‘C’ बद्दल कळत होतं आणि दिवसा दिवसाला माझी अस्वस्थता वाढत होती. आयुष्यात पहिल्यांदा असं काहीतरी होत होतं. ‘Frustration’ या शब्दाचा अर्थ पुरता कळत होता.
शेवटी माझी मन:स्थिती इतकी वाईट झाली की मला आता हे कोणाशी तरी बोलणं आणि मार्ग काढणं भाग होतं, जीव गुदमरत होता रोजच. तेव्हा तोच एक माणूस मला आधार वाटला. ‘पियुष सर’. मी हे सर्व पियुष सरांना सांगितलं mail वर (माहीत नाही मला भीती वाटते ग्रेट लोकांसमोर बोलण्याची किंवा व्यक्त होण्याची). त्यांनी मला फोन केला, विचार करून निर्णय घ्यायला आणि कॉलेज च्या ‘placement coordinator’ शी बोलायला सांगितलं. माझा निर्णय झाला होता त्यामुळे विचार करण्याचा प्रश्न नव्हता. मला बेरोजगार राहिलेलं चालणार होतं पण मला आता ‘C’ सोडून काम करायचं नव्हतं.
13 ऑगस्ट 2013, सोमवार, मी ऑफीसला न जाता आमच्या placement coordinator ला माझा निर्णय सांगायला कॉलेज मधे गेलो. कॉलेज च्या gate पासून ते त्या व्यक्ती च्या cabin पर्यंत जाताना मला कंपनी न सोडण्याचे अनेक सल्ले भेटले काही मित्रांकडून, कॉलेज ने दिलेली कंपनी सोडणे हे त्यांच्यासाठी धक्कादायक होतं कारण त्याचे परिणाम माझ्यासकट सर्वच जाणून होते. शेवटी मी त्यांच्या cabin मधे गेलो. बाहेर आलो ते 3 तासांनी. ते 3 तास मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही… त्या 3 तासात माझा प्रचंड अपमान झाला. आतमधे ती व्यक्ती, आमचा CR, त्याचा मित्र असे 3 जण होते. मी माझं मत सांगितल्यानंतर ती व्यक्ती खूप काही बोलली, ‘ज्या C मधे तुला काम करायचंय त्यात तू BCS आणि MCA ला काठावर पास आहेस कळतंय का?’, ’कितीतरी students ना जॉब मिळत नाही म्हणून माझ्याकडे येतात, रडतात आणि तू हातातला सोडतोय.’, ‘तू स्वत:ला फार शहाणा समजतोस का?’, ‘तुझी लायकी आहे का?’ या आणि अशा अनेक वाक़यांमधे ती व्यक्ती आणि बाकीचे दोघं माझ्याशी बोलत होते आणि मी फक्त भरलेल्या डोळ्यांनी एवढंच म्हणत होतो की ‘मला त्या कंपनीमधे काम करायचं नाही.’ शेवटी तेच थकले. मला मूर्ख ठरवून मोकळे झाले. आणि मला 2 दिवसात अंतिम निर्णय घेऊन application द्यायला सांगितलं की ‘कॉलेज ने दिलेली placement मी सोडत आहे, इथून पुढे कॉलेज मला placement देणार नाही, याला मीच जबाबदार आहे’.
हे सगळं होऊन 3 तासांनी जेव्हा बाहेर आलो तेव्हा कुठेतरी आधीचा confidence गेल्यासारखा वाटला कारण एवढा आणि अश्या शब्दांत अपमान झाला नव्हता कधी, आणि ‘ती व्यक्ती’ बोलली ते सगळंच खोटं होतं असं ही नाही. आणि खरंच मी चुक करतोय की काय असं वाटायला लागलं. आणि असं वाटणं हे तर अजुनच वाईट होतं. आधीपेक्षाही वेगळ्या अवस्थेत मी गेलो. बाहेर मला सगळ्यांनी कंपनी सोडू नको असा सल्ला पुन्हा दिला. मी आतून पूर्णपणे हललो होतो. मला एकच प्रश्न होता की जे मला वाटतंय की मी हे करू शकतो ते मी खरच करू शकतो का? म्हणजे हा confidence आहे की over-confidence?
शेवटी मी पियुष सरांना फोन करून भेटण्याची विनंती केली आणि त्याच दिवशी रात्री 9 वाजता भेटायला गेलो. जेव्हा सर भेटले तेव्हा 5 मिनिट मी फक्त रडलो, मला शब्दच फुटत नव्हते. नंतर त्या दिवशी cabin मधे जे काही झालं, मला नेमकं काय करायचंय हे सगळ सरांना सांगितलं. तेव्हा सरांनी मला पाठिंबा दिला. आणि सर आधार देताना एक वाक़य बोलले की “तू हे नक्कीच करू शकतोस, आणि तू कंपनी सोडतोय याचं वाईट वाटून घेऊ नकोस, तू ‘XYZ’ सोडून आलाय, ‘PQR’ सोडून आला नाहीयेस“. त्या दिवशी अचानकपणे ‘PQR’ माझं स्वप्न बनलं. आणि मी पेटलो.
कॉलेज मधे मला कंपनी सोडल्याबद्दल ‘त्या’ व्यक्तीकडून, काही मित्रांकडून टोमणे मिळत होते, काही मित्र ‘त्या व्यक्ती’ च्या भीतीपोटी माझ्यापासून लांब गेले. इकडे माझा ‘C’ चा अभ्यास मी त्या घटनेनंतर एक महिन्यात बर्यापैकी केला. ‘C’ इतकं आवडलं होतं की मला आता हे कोणाला तरी सांगावंस वाटत होतं. योगायोग असा, मी सहज माझ्या एका मैत्रिणीला mobile chat करताना ‘C’ कोणालातरी सांगण्याची इच्छा बोलून दाखवली. लगेच तिने मला विचारलं की “माझ्या बहिणीला शिकवशील का, ती BCS 1st Year ला आहे?” मी बोललो चालेल, मी तिच्या घरी जाणार होतो शिकवायला. 2 दिवसांनी मला कळलं की तिच्या बहिणीच्या काही मैत्रिणी आहेत, त्यांना पण शिकायचंय. मग माझ्या घरी यायचं ठरलं. आणि आमच्या घरी 28 सेप्टेंबर 2013 ला 8 मुलींची ‘C Batch’ चालू झाली. मला त्या बॅच कडून खूप शिकायला मिळालं. त्यांच्या त्या basic doubts मुळे आणि सगळ्याच बॅच मुळे. मी ‘C’ नंतर ‘Data Structures’, ‘C++’ चा अभ्यास केला. आणि त्या आणि त्यांच्या reference ने आलेल्या मुलांना मी ते ही माझ्यापरीने शिकवलं. त्यांना ते आवडलं. त्यांना मी गोखले सरांचे, पियुष सरांचे अनेक संस्कार देण्याचे प्रयत्न केले. अजूनही मी गोखले सरांचा student बनलो नव्हतो, ते माझ्या आयुष्यात होते पण त्यांना अजूनही पाहिलं नव्हतं. कारण ‘C Batch’ चालू झाल्यानंतर 2 महिन्यांनी मला मुंबई ला ‘C Developer’ असा जॉब मिळाला. मी तिकडे होतो. पण गोखले सरांबद्दल सगळीकडून ऐकायलाच खूप मिळालं होतं, त्यामुळे संस्कार कळत चालले होते. त्यांचे वेध आणि वेड दोन्ही लागले होते.
मधल्या काळात मी आणि होणार्या बायकोने सरांचे ‘Computer Fundamentals’ आणि ‘OS seminar’ केले PVG(2014) ला. तेव्हा त्यांचं साक्षात दर्शन पहिल्यांदा झालं, मी देव ’याची देही, याची डोळा’ पाहिला, पण लांबून. आणि आता जवळून देव पाहायचा होता. देवाकडून आयुष्य शिकायचं होतं. आणि UNIX-2014 लावायचा निर्णय घेतला.
मुंबई ला Monday-Friday जॉब आणि Saturday-Sunday घरी येऊन क्लास. असं 1 वर्ष चाललं. पण नंतर त्या दगदगीमुळे शरीराने साथ दिली नाही, आजारी पडलो. आणि मुंबई चा जॉब सोडण्याचा निर्णय घेतला दुसरा जॉब हातात नसताना. January,2015 ला मी परत तो जॉब सोडून येणार होतो आणि गोखले सरांची ‘UNIX-2014 Batch’ चालू होणार होती 15 December, 2014 ला. मला पहिले 6 lectures ऐकायचेच होते आणि ते ही LIVE (recordings मधून नाही). कारण माझी priority आधी सर आणि मग UNIX अशी होती. फक्त याच कारणासाठी मी तेव्हा क्लास लावला नाही. वाईट खूप वाटत होतं म्हणजे मीच माझ्या मित्रांना भांडून भांडून पाठवलं होतं सरांकडे ‘UNIX-2014’ ला आणि मलाच जमणार नव्हतं. पण 1 वर्ष माझ्याच्याने थांबवणार नव्हतं. ते पाय मला जवळून पाहायचे होते. मी ‘WinRT-2015’ लावायचा निर्णय तेव्हाच घेतला. मला खरच Win32, COM, WinRT शिकायचं नव्हतं, मला फक्त सरांना ऐकायचं होतं आणि खरच मी तेच केलं. मी इतकं नाही शिकलो. मात्र मी सरांना खूप ऐकलं. पण मी शिकणार नक्की.
January, 2015 ते March, 2015 मी घरीच होतो. तेव्हा फक्त अभ्यास आणि क्लासेस चालू होते. मार्च मधे मी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं. मला ‘PQR’ मधे जॉब मिळाला. खूप आनंद झाला.
बस, इतकंच.
सध्या सरांचे संस्कार घेण्याचे, इतरांना देण्याचे प्रयत्न करतोय. ज्या विषयात माझे स्वत:चे backlogs होते, काठावर पास होतो तेच विषय आता शिकवताना आनंद आणि भरून पावल्यासारखं वाटतं. जी जागृती ते विषय शिकताना मला मिळाली नव्हती ती जागृती आता प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला खोटं वाटेल, जसं नाटकाच्या रंगमंचावर जाण्याआधी प्रत्येक नट त्याच्या त्या कर्मभूमीच्या पाया पडतो, तसं मी क्लास मधे येऊन शिकवण्याआधी पाया पडतो तेव्हा ते या माझ्या आयुष्यातल्या ग्रेट लोकांना असतं. आणि हे गोखले सरांना पाहिलंही नव्हतं तेव्हापासून. सरांनी दिलेल्या संस्कारांना मी कधीच विसरू नये, सरांना जसा शिक्षक अपेक्षित आहे तसं बनता यावं यासाठी असतं. मुलांच्या feedbacks मधे जेव्हा गोखले सर, पियुष सर यांची नावं येतात, त्यांच्या ‘मास्तर’ ला शिकवल्याबद्दल ते जेव्हा यांचे आभार मानतात तेव्हा वाटतं किती सुंदर झालंय हे सगळंच.
शेवटी मॅडम विषयी च्या ‘Expressions’, त्यांच्याविषयीचा वेगळाच आदर वाटतो. Admission च्या वेळी त्या जेव्हा म्हणतात ‘ये बाळा, तुझं नाव?’ तेव्हा त्यांच्या ‘बाळा’मधे ‘आई’ जाणवते. आणि एवढा मोठा ‘वटवृक्ष’ त्यांनी ज्या लिलयेने सांभाळलाय त्याला सलाम. सरांचे आणि मॅडमचे पाय जर माझ्यासमोर एकाच वेळी आले तर मी मॅडम च्या पाया आधी पडेल, कारण आमच्या सरांच्या पायांचं श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी मॅडम च्या पायांची साथ महत्वाची होती आणि आहे. हे सगळेच ‘THE GREAT’ आहेत.
फक्त मॅडम विषयी एक तक्रार करायची होती, ती तक्रार ‘बाळाच्या’अधिकाराने तुमच्या समोरच सांगून टाकतो मॅडम ना, ‘लहान तोंडी मोठा घास’ पण राहावत नाही कारण कदाचित तुमची मतं आणि माझी तक्रार same असतील.
मॅडम, तुम्ही माझ्याशी पहिल्यांदा जेव्हा बोललात तेव्हा असं म्हणाला होतात की “अरे का सरांना ‘देव’ बनवता? जरा ‘माणूस’ म्हणून जगुद्या की.” खरं तर असं म्हणून, इतकं मोठं मन करून तुम्ही पुन्हा देवाच्याच रांगेत जाउन बसता. तरी मॅडम, माझे काही प्रश्न आहेत.
1. मला जेव्हापासून कळलंय तेव्हापासून मला हा प्रश्न पडलाय की “एखाद्या माणसाच्या हातात Computer क्षेत्रात पहिलं पुस्तक ‘The C programming language by K&R’ पडतं जे सगळ्यात अवघड मानलं जातं, ते तो वाचतो, वाचून त्याला ते समजतं, बर फक्त समजतच नाही तर ते वाचून ‘C Language’ वर प्रेम होतं (!), प्रेमच नाही तर पुढचं पण शिकू वाटतं, आणि फक्त वाटतच नाही तर तो माणूस खरंच पुढचं सगळं शिकतो. आणि धक्का म्हणजे हे सगळं करणारा माणूस ‘’डॉक्टर(माणसांचा)”, “ज्योतिषशास्त्री”, “नाटककार”, “आणि अजुन बरंच काही”. हे सगळं ‘दैवी’ नाही का वाटत? बर तरी मग आम्ही त्या ‘माणसा’ ला ‘देव’ का नाही म्हणायचं?
2. एखादा माणूस संकटात असेल तर तो आधारासाठी शेवटी देवाचा धावा करतो, मग त्याला आत्मबळ येत, देव त्याच्या पाठीशी आहे हे त्याला जाणवतं, त्या जाणिवेने तो त्या संकटातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो, आणि बाहेरही येतो. आणि त्याचं आयुष्य सुंदर बनतं. याहून वेगळं देव असं काय काम करतो? काहीच नाही. तर मग हेच आणि असंच काम जर एखादा ‘माणूस’ आम्हा विद्यार्थ्यांसाठी करत असेल तर आम्ही त्याला ‘देव’ का नाही म्हणायचं?
थांबतो,
2010 पासून सरांबद्दल फक्त ऐकलं होतं आणि चरणाशी गेलो मात्र 2015 मधे, याचा खेद वाटतो. आणि उशिरा का होईना पण ‘देव पाहिला’याचा आनंद ही वाटतो.
धन्यवाद.
एक शून्य.