Expression

सौ. वैदेही वि. गाजरे

सौ. वैदेही वि. गाजरे ह्या वरूण गाजरे ह्या विद्यार्थ्याच्या आई आहेत.
वरूणने ॲस्ट्रोमेडीकॉम्प मध्ये – WinDev 2020, UNIX 2020, RTR 2021 (RTR 4.0 – as student), UNIX 2022 आणि RTR 2023 (RTR 5.0 – as Group Leader) – हे Courses पूर्ण केलेले आहेत. सध्या नव्यानेच सुरु झालेला “Advanced Real-Time Rendering” (ARTR) Course करत आहे.

ॲस्ट्रोमेडीकॉम्प-
पाच सहा वर्षांपूर्वी माझा मुलगा या परिवारात सामील झाला. वेगवेगळे कोर्स, सेमिनार करत होता. एवढ्या मोठ्या कालावधीत, नकळत आम्ही कुटुंबीय पण त्या परिवारात  सामील झालो.
 
वाढदिवसाचे डेमो, डीएस डेमो, वेबजीएलचे डेमो, फायनल डेमो हे सगळे, आतापर्यंत घरी बसून बघत होतो. विविध विषयांवर असलेले डेमो, मुलांचा प्रोत्साहनपर जल्लोष, नंतर सर आणि मॅडम चं मनोगत हे कॉम्प्युटर वर बघत असतानाही  एक प्रकारची सकारात्मक, आश्वासक ऊर्जा नेहमीच जाणवत असे. ही ऊर्जा एरवी अगदी लेक्चर मध्येही जाणवत असे़!!
मात्र यावेळी दि. ४ जानेवारीला, आरटीआर ग्रुप लीडर ची पालक या नात्याने हे सगळं प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं.  हा अविस्मरणीय  अनुभव होता, यापेक्षा जास्त वर्णन नाही करता येणार.
डेमो बघत असताना, मधल्या वेळेत आजूबाजूला बसलेल्या पालकांशी बोलणं झालं. कोण कुणाचे पालक आहेत हे समजलं.  सगळ्या मुलांची नावं, ग्रुप मीटिंगमुळे गेली तीन वर्षं आम्हां पालकांच्या कानावर पडत असल्याने आपोआपच आमच्यातला परकेपणा गळून गेला आणि आम्ही फार जुनी ओळख असल्यासारखे एकमेकांशी बोलू लागलो. असे बंध निर्माण होणं हल्ली दुर्मिळ झालं आहे पण हा अनुभव ‘गुरुकुलामुळे’ मिळाला.

ॲस्ट्रोमेडीकॉम्प चं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे , या परिवारात  काही विद्यार्थी असे आहेत, ज्यांचा लिंक्डइन वरचा प्रोफाईल बघितला तर एरवी त्यांच्या समोर उभं पण रहायचं धाडस होणार नाही. पण इथे येताना ते आपल्या पदव्या, कंपनीतील पदं इतक्या सहजपणे मागे सोडून आलेले असतात, जसं देवळात जाताना माणूस आपल्या चपला देवळाबाहेर काढून मग आत जातो.  त्यामुळे इथे ही ज्येष्ठ मंडळी, दादा या नात्याने मुलांना लाभतात. त्यांची मदत, मार्गदर्शन नवीन मुलांना सर्वार्थाने मिळायला लागतं.  या निमित्ताने एक घटना मला आठवली. एक मुलगा इंटरव्ह्यू द्यायला मोठ्या कंपनीत गेला होता. अतिशय औपचारिकपणे, पुरेशा गांभीर्याने इंग्रजी भाषेत मुलाखत चालू झाली. काय काय येतं, काय कुठे शिकलास वगैरे विचारणा चालू होती. ते सांगता सांगता,  उमेदवाराने सरांकडून काय शिकला ते सांगितलं आणि जादुची कांडी फिरावी तसं झालं. कारण मुलाखत घेणारा पण सरांचा विद्यार्थी होता. औपचारिकता गळून पडून नंतर ते दोघे एकमेकांशी मराठीत कधी बोलायला लागले हे त्यांनाही कळलं नाही. ही ताकद इथल्या बंधुभावाची आहे, इथे तयार होणाऱ्या घट्ट नात्याची आहे.

ॲस्ट्रोमेडीकॉम्पच्या गुरुकुलात विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर बद्दलचं ज्ञान मिळतंच.  पण इथलं प्रशिक्षण हे एका अर्थाने सैनिकी प्रशिक्षणाएवढंच खडतर वाटतं मला(शारीरिक प्रशिक्षण वगळता).
आरटीआर करणं हे विद्यार्थ्यांचं पहिलं प्राधान्यच असलं पाहिजे हा आग्रह असतो सरांचा. त्यामुळे त्या काळात घरी कोणत्याही प्रकारच्या अडचणी, आजारपणं (स्वतः ची/घरातल्यांची), लग्नं, जन्म, मृत्यू काहीही झालं तरीही सरांच्या, मॅडम च्या प्रोत्साहन/धाकामुळे, असाईनमेंट्स वेळेत पूर्ण करण्यासाठी मुलं जीवाची पराकाष्ठा करतात. डेमो पूर्ण होण्याआधी तर किती रात्रींच्या कोजागिरी होतात ते न मोजणंच बरं. या सगळ्या प्रक्रियेत  मुलांमध्ये चिकाटी, जिद्द, सातत्य, समर्पणाची भावना, कष्टाळूपणा,  दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीत पाळणे, अभ्यासू वृत्ती जोपासणे, एकमेकांना मदत करणे या अशा अनेक गुणांची जोपासना नकळत होते.
” Be cruel with yourself” आणि “मेलात तर भूत बनून या लेक्चरला.” या सरांच्या शब्दांतच येतं सगळं आणि मग मुलं आमूलाग्र बदलतात.

“एका बीजापोटी तरू कोटी, कोटी जन्म घेती सुमने फळे” या प्रमाणे सरांनी रुजवलेल्या संस्कारांमुळे, दिलेल्या ज्ञानामुळे;  शिक्षकी पेशाचं महत्त्व आणि पावित्र्य मुलांच्या लक्षात येतं. त्यातून किती तरी विद्यार्थांमधून शिक्षक घडले.  सरांची कन्या जिचं नावंच “प्रज्ञा” आहे ती पण आता शिक्षक झाली आहे.
सरांनी जाणीवपूर्वक पासपोर्ट काढला नसला तरी सरांचे बरेच विद्यार्थी, जगभरातील विविध देशांमध्ये नामांकित कंपन्यांत कार्यरत आहेत. “ज्ञान मिळवण्यासाठी शिका, अर्थार्जनासाठी शिकू नका.” ही सरांची शिकवण.  ज्ञानामुळेच तुम्हांला अर्थ आणि आदर दोन्ही मिळेल असं सर नेहमी म्हणतात आणि स्वतः च्याच उदाहरणाने त्यांनी ते सिद्धही करून दाखवलं आहे.

ॲस्ट्रोमेडिकॉम्प मध्ये –
तुम्हांला संस्कार, जीवन मूल्यं आणि ज्ञान मिळतं ज्यामुळे तुमची कुंडली काही प्रमाणात तरी बदलून तुमची प्रगती होते.
या परिवाराचे सदस्य झाल्यामुळे, वैद्यकीय क्षेत्रातील काही मार्गदर्शन आवश्यक असल्यास, सरांकडून तेही मिळू शकतं.
आणि
शेवटी ज्ञानाच्या बाबतीत तर असं आहे की, “देणा-याचे हात हजारो दुबळी माझी झोळी”. ज्ञानगंगेचा प्रवाह अखंड वाहतोय.
ही ज्ञानगंगा, भविष्यात शतधारांनी नव्हे सहस्र धारांनी वहात रहावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏🙏

– सौ. वैदेही वि. गाजरे.