UNIX 2022, RTR 2023
प. पू. श्री गोखले सर आणि मॅडम
शिरसाष्टांग नमस्कार,
माझे नाव यश राजेश सावळकर आणि मी RTR ५.० कॉम्प्युट ग्रूप चा सदस्य आहे. माझ्याकडुन काहिही चुकीचे लिहिण्यात आले असेल तर माफी असावी. हे लिहिण्याचे कारण म्हणजे, बरेच दिवसांपासून एक इच्छा होती की आपण एक शिक्षक बनायला हवे म्हणून, मी जानेवारी २०२३ पासुन माझी लहान बहीण जी नुकतीच पुण्यात अभियांत्रिकी करायला आली होती, तिला मी C लँग्वेज आणि फंडामेंटल्स शिकवायला लागलो. जानेवारी २०२३ मध्ये जेव्हा मी सरांचा फंडामेंटल्स चा सेमिनार केला तेव्हा सरांची शिकवण्याची पद्धत आणि कंटेंट बघून मी अक्षरशः फिदा झालेलो. मी त्याच सेमिनार चा कंटेंट(सीपीयू व्यतिरिक्त) सुद्धा तिला शिकवला जो तिलाही खूप आवडला..
यावर्षी गुढी पाडव्या ला मी माझ्या एका कॉलेजच्या मॅम ला कॉल केला आणि त्यांना म्हणालो की “कॉलेज मधल्या विद्यार्थ्यांना संगणकाच्या मूलभूत संकल्पना शिकवण्याची संधी मला मिळू शकते का?” तर त्या म्हणाल्या की आम्ही नक्कीच बोलवू, पण तेव्हा मुलांची एंड सेमिस्टर परीक्षा सुरु होती म्हणून त्या म्हणाल्या की आम्हि तुला पुढच्या सेमिस्टर मध्ये बोलवू. त्यामुळे मी जरा नाराज झालो पण जस मॅडम म्हणतात की “प्रत्येक गोष्ट काही ना काही कारणा साठी होते” आता माझा पण त्याच्यावर नितांत विश्वास बसला आहे, शंभर टक्के खरं आहे ते. मी त्यांना या वेळी पुन्हा संपर्क केला तेव्हा त्या हो म्हणाल्या आणि सेशन साठी १४ ऑक्टोबर हा दिवस ठरला. मी सेशन साठी त्यांच्याकडे ४ तासांची वेळ मागितली पण काही कारणांमुळे त्या तितका वेळ मला देऊ शकल्या नाही आणि साहजिकच होतं. कदाचित त्यांना पण वाटत असेल की ह्याला आज पर्यंत कुठे शिकवण्याचा अनुभव नाही आणि तेही एवढ्या विद्यार्थ्यां समोर! म्हणून, त्यांनी मला कसा बसा दीड तासाचा वेळ दिला.
आणि तो दिवस आला “१४ ऑक्टोबर”. त्याच्या आधीच्या रात्री एखादं लहान मूल ज्या उत्साहाने दिवाळी किंवा वाढदिवसासाठी नवीन कपडे घेतं अगदी त्याच उत्साहाने मी पण नवीन कपडे आणि एक ऑफिस बॅग घेतली. सकाळी १० वाजता प्रोग्रेसिव एज्युकेशन सोसायटी चे मॉडर्न कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी विभागात पोहचलो. माझ्या कडून तिथल्या मॅडमना पण जास्त काही अपेक्षा नव्हत्या आणि त्यात काहीच चूकीचे ही नाही. मी सेमिनार हॉल मध्ये गेलो त्यांनी माझा सत्कार केला आणि मग मी बोलायला सुरवात केली.त्या क्षणी मी थोडा भावूक झालो कारण मी कॉलेज मध्ये असताना मला याच सेमिनार हॉल मधून बाहेर काढलं होतं आणि आज त्याच सेमिनार हॉल मध्ये उभा राहून मी शिकवणार होतो . अभियांत्रिकी च्या द्वितीय व तृतीय वर्षाचे मिळून अंदाजे ६५-७० विद्यार्थी उपस्थित होते. सत्राच्या सुरवातीलाच विद्यार्थ्यांना या गोष्टीची हमी दिली की मी तुमच्या ह्या दीड तासाचा कचरा नाही होऊ देणार आणि समजा तुमच्यापैकी एका मुलाने सुद्धा कंटाळुन मोबाईल बाहेर काढला तर ह्या सत्रा मध्ये मी अनुत्तीर्ण झालो. मी त्यांना संगितलं की मी एक “बॅक बेंचर” होतो आणि जवळजवळ प्रत्येक सेमिस्टर मध्ये माझे काही विषय बॅक (नापास) होते म्हणून काळजी करू नका मला पूर्ण कल्पना आहे की जेव्हा समोरचा बोलत राहतो आणि आपल्याला कंटाळा येत असतो तेव्हा आपण काय करतो.
मी सत्राची सुरवात १ byte हे ८ bits का आहेत हे सांगून केली, स्टोरेज डिव्हाइसेस मध्ये हार्ड डिस्क आणि थोडं फार रॅम बद्दल सांगितल, वेबसाइट स्लो का आहे आणि बीजीएमआय(pubg) फास्ट का आहे , C मध्ये कॅरॅक्टर १ byte चा आणि जावा मधे तेच कॅरॅक्टर २ byte चा का आहे ते सांगितलं. मी त्यांना म्हणालो की जर तुम्हाला माझं शिकवणं आवडलं असेल तर तुम्ही तुमच्या मॅडमना मला पुन्हा बोलावण्याची विनंती करा. शेवटी त्यांचा साठी OpenGL FFP मध्ये एक छोटासा डेमो बनवला होता तो त्यांना दाखवला. दीड तास सगळ्यांच लक्ष फक्त माझ्याकडे होत आणि कोणालाही आपला मोबाईल बघावा अशी इच्छा सुद्धा झाली नाही.
सत्र संपल्यावर मला तिथल्या एका मॅडम नी विचारले देखील की “अरे यश! तू एवढं कधी शिकलास?” कॉलेज मध्ये असताना मी त्याच मॅडम चा एक नावडता विद्यार्थी होतो.पण शेवटी, आज मला माझ्या टाळ्या भेटल्याच.
बाहेर निघाल्यावार २०-२५ मुलांनी मला गाठलं आणि माझ्याशी बोलायला लागले. त्यांच्याकडे माझ्यासाठी बरेच प्रश्न होते .त्यांनी खूप चांगल्या प्रतिक्रियाही दिल्या. एवढच नाही तर पुढे होऊन त्यांनी मला त्यांच्या कॉलेजच्या टेक्निकल कम्युनिटी मध्ये समाविष्ट होऊन शिकवण्याची विनंती केली.
मी ज्या मॅडमना सत्रासाठी वेळ देण्याची विनंती केली होती त्यांचे मनापासुन आभार मानले. त्या मला म्हणाल्या की सगळ्यांना सत्र आवडलं आणि ते अजून एका सत्रा साठी आग्रह करत आहेत. मला काही मुलांचे मेसेज पण आले की त्यांना माझ्याकडुन शिकण्याची इच्छा आहे.
माझ्या आयुष्यातला एक सगळ्यात सुंदर दिवस होता हा.
मी सरांना मनापसून धन्यवाद म्हणू इच्छितो कारण सरांमुळेच ही गोष्ट शक्य झाली . सर जसं म्हणतात की शिकवण्यामुळे खूप आदर आणि कीर्ती भेटते त्याची आज अनुभूती आली. मॅडम आणि प्रज्ञा मॅडम ला पण मनापासून धन्यवाद कारण तुम्ही ज्या छोट्या छोट्या गोष्टी शिकावता त्यामुळे जो मोठा बदल घडतो ते शब्दात सांगणं शक्यच नाही, ते फक्त अनुभवता येऊ शकतं. आणि last but not the least माझी group leader ऋतु चौगुले हीने पण मला नेहमी शिकवण्यासाठी प्रोत्साहित केले म्हणून तिचे पण मन:पूर्वक आभार 🙂.
धन्यवाद … 🙏
आपला ऋणी,
यश राजेश सावळकर
