UNIX
|| श्री ||
नमस्कार सर ,
तसं तर UNIX चा क्लास अजून पूर्ण झालेला नाही. पण राहावतच नाही, म्हणून लिहितो आहे. क्लास सुरु होताना हि कल्पना होतीच, कि हा विषय खूप चांगल्या प्रकारे शिकायला मिळणार आहे. पण चार chapters संपेपर्यंतच जो थक्क करणारा अनुभव आला, त्याने व्यक्त होण्यास भाग पाडलं.
सर! UNIX सिस्टिम च्या माध्यमातून तुम्ही आमची Belief सिस्टिमच हादरवून टाकलीत. एव्हडे दिवस माळ्यावरच्या बॉक्स मध्ये धूळ खात पडलेलं Bach चे पुस्तक, मला एखाद्या अद्वैत ज्ञानाने भरलेल्या ग्रंथासारखे दिसू लागले. आणि या ग्रंथाचा आधार घेऊन, तुम्ही आयुष्याचा अर्थही समजावत आहात; हे उमगू लागले. UNIX शिकण्यासाठी जी फीस आहे, ती तर कमी आहेच.. पण UNIX शिकवता शिकवता तुम्ही जे आयुष्य शिकवताय, त्याची किंम्मत कुबेराचे नऊ च्या नऊ खजिने ओतले तरी करता येणार नाही.
UNIX शिकताना असं कधी वाटलंच नाही, की आपण एखादा अवघड व तांत्रिक विषय शिकत आहोत. प्रत्येक लेक्चर म्हणजे एखाद्या सुंदर कलाकृतीचा आस्वाद घेण्याचा एक अनुभव होता. आणि ही कलाकृती सर्वांचा विचार करून बांधलेली होती. जस की एका lecture ला file व process बद्दल सांगताना, तुम्ही जशी सांख्य तत्वज्ञान, प्रकृती-पुरुष अशी आध्यात्मिक उदाहरणे दिलीत. त्याचवेळी पंखा व वीज यांसारखी घरगुती उदाहरणेही हटकून दिलीत.
प्रत्येक थरातील विद्यार्थ्याला मनात ठेवून तुम्ही शिकवत होतात.. आणि आमच्या मनात आलेले, अथवा पुढे येऊ शकणारे असे सर्व प्रश्न, तुम्ही स्वतःच निर्माण करून त्यांचं निराकरण करू लागलात. विद्यार्थ्यांचा एव्हडा विचार करणारे शिक्षक; आणि त्यात कहर म्हणजे वेगवेगळ्या पातळीवरचे विद्यार्थी काय विचार करतील हा हि विचार करून शिकवणारे शिक्षक… हे सगळं स्वप्नवत होतं.
UNIX शिकताना जे घडत गेलं त्याचा कधी विचार केला नव्हता.. अद्भुत !!
” ठेविले अनंते तैसेचि रहावे| चित्ती असू द्यावे समाधान |” या संत तुकारामांच्या अभंगाचा अर्थ ‘getblk’ नावाचा अल्गोरिथम शिकताना कळला. त्यावेळी ‘अंगावर काटा येणे’ हा शब्दप्रयोग हि कमी वाटला मला. अष्टसात्विक भाव वगैरे जागं होण्यासारखं काहीतरी होतं ते. आणि मग असे अनुभव, ही नेहमीचीच गोष्ट होऊन गेले.
‘User Mode’ व ‘Kernel Mode’ शिकवताना तुम्ही जी वातावरण निर्मिती केलीत… ‘थेटर मधला तो अंधार’, ‘बॅटरी घेऊन उभा असणारा वाटाड्या’, आणि त्यात तुमचं ते नटसम्राट मधील स्वगत… “अनिकेत ईश्वराला मिळालं घर!”… खरंच शब्द नाहीत सर…”त्यावेळी तुम्ही नक्की कोण होतात?”… इतक्या प्रभावीपणे कलाकृती बांधणारे दिग्दर्शक?… ती तितक्याच आर्तपणे मांडणारे अभिनेते?… त्यातला गहन अर्थ पोटतिडकीने समजावणारे शिक्षक?.. तुम्ही त्यावेळी या सगळ्यांच्या पलीकडे होतात!!.. तुम्ही त्यावेळी देव होतात!!!.. नव्हे नव्हे तर त्याहूनही श्रेष्ठ…गुरु!!!!
गुरुगीतेतही श्री शंकराने देवाहून श्रेष्ठ अधिकार गुरूंना दिला आहे.त्यामुळे तुम्ही UNIX सिस्टिम व Bach ग्रंथाला तुमच्याहून श्रेष्ठ मानत असलात, तरी आमच्यासाठी त्याहून कित्येक पटीने श्रेष्ठ तुम्ही आहात. कारण तुम्ही नसतात तर हा दैवी विषय आम्हाला कधीच समजला नसता. दासबोधात समर्थ रामदास म्हणतात…
सद्वस्तु दाखवी सद्गुरू | सकळ सारासार विचारू | परब्रम्हाचा निर्धारू | अंतरी बाणे ||
फोडुनी शब्दांचे अंतर | वस्तु दाखवी निजसार | तोचि गुरु माहेर | अनाथांचे ||
UNIX सिस्टिम हि सद्वस्तु, अगदी त्यातले बारकावे उलगडून तुम्ही अशी समजवायला घेतलीत की परब्रम्ह (Kernel) चा न्याय.. त्याचं प्रयोजन हे अंतरी बिंबवलं गेलं.. आणि यासाठी तुम्हाला जे शब्दांचे अंतर फोडावे लागले ( Reading between the lines in Bach ) ते आम्हाला आयुष्यात कधी उलगडले नसते.
UNIX बद्दल सांगावं तेव्हड कमीच आहे..त्यामुळे आता आयुष्याबद्दल तुम्ही जे शिकवलत, त्या बद्दल थोडसं सांगतो. अगदी पहिल्या दिवशी, तुमची गोष्ट सुरु झाली तेव्हापासुनच हे बहुमोल शिक्षण सुरु झालं. तुम्ही ‘connecting the dots by looking backward’ बद्दल सांगितलत सर, व तुम्ही सांगितलेले concepts मनन करत, असेच dots connect करत गेलो… आणि आयुष्यातील अनेक न सुटलेली गणिते, या सूत्रांनी सुटत गेली. तुम्ही अगदी सहजपणे म्हणुन गेलेली वाक्ये, तुकाराम महाराजांनी वाटलेल्या परिसांसारखी अमूल्य होती.. घरी जाऊन, लोखंडावर घासुन पाहिल्यावरच त्यांची किंम्मत कळेल अशी! यातली आत्ता आठवणारी दोन उदाहरणे सांगतो.
‘अधिक कष्ट, अधिक पैसा’ हे प्रमाण तुम्ही सांगितलत.. आणि ‘प्रत्येक गोष्टीला तिचा वेळ दिला पाहिजे,no shortcuts’ हे तत्व तुम्ही शिकवलत. आवड म्हणुन गेली पाच-सहा वर्षे ज्योतिष शास्त्राचे अध्ययन करताना, कुठल्याच पुस्तकात किंवा व्हिडीओ मध्ये मला ‘शनी’ ग्रहाबद्दल जे कळू शकलं नाही; ते मला या एका वाक्यावर मनन करताना कळलं.
आणि बरोबर याच्या उलट.. तुम्ही कॅन्सर ची व्याख्या सांगितलीत.. आणि खूप हादरलो!.. पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटलं!!.. कारण ह्याच मार्गावरून नकळतपणे, थोडा का होइना.. पण चालू लागलो होतो. आणि मग यातून.. ज्योतिष शास्त्रातील ‘राहू’ ग्रह व कॅन्सर च relation अधिक उलगडत गेलं. राहुला pressure cooker चा कारक का मानतात ते कळलं. ‘कमी कष्ट, कमी वेळ..आणि जास्त शिजवणे’.. आणि मग समुद्रमंथना नंतरची राहूची गोष्ट अशी कळली कि आधी कधीच कळली नव्हती..अमृत वाटपाची गोष्ट..!!
..खूप कष्ट करुन, Proper behavior आणि discipline सांभाळून, आयुष्यभर राहिलेल्या deserving लोकांना जे अमृत वाटलं जाणार होतं; ते राहूला कमी कष्टात, काहीही follow न करता shortcut ने हवं होतं. पण तो, ते पचवू शकला नाही…कॅन्सर!! अशा सर्व लिंक लागत गेल्या. आणि ‘अमृत सेविताच पावला | मृत्य राहो |’ या समर्थ रामदासांच्या ओवीचा, पहिल्यांदा उलगडा झाला.
ही फक्त दोनच उदाहरणे सांगितली..ती योगायोगाने ज्योतिषा संबंधीत होती. पण सर, आणखी बऱ्याच क्षेत्रात अनेक गोष्टी उमगत गेल्या. आयुष्यात आपण नक्की कुठे चुकलो.. काय चुकलो.. आणि आता काय केलं पाहिजे याची clarity आली. तुमची ‘Terminology oriented study’ , ‘concentration व consistency चा मिलाफ’ ही व अशी आणखी सूत्रे आज पर्यंत कधीच कोणी समजावल्या नाहीत अशा अत्यावश्यक basic techniques समजावून गेली.
आणि ‘Knowledge is interrelated’ हा तर त्यावरचा कळसच!! बलराज सहानी, अमिताभ बच्चन यांचे डायलॉग्स.. कुसुमाग्रज, पु.ल. यांसारखे साहित्यिक.. गदिमा, साहिर यांची गीते.. मॅट्रिक्स, इक्विलिब्रियम इत्यादी चित्रपट.. आणि आणखीन बरंच काही.. असं प्रत्येक जण मग UNIX शिकवू लागलं.. प्रोग्रामिंग करणं म्हणजेच ‘ढाचे से कहानी बनाना’.. ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ म्हणजेच ‘Talk is cheap, show me your code’. असं सगळं एकमेकात गुंफलेलं ज्ञान समजून घेण्याची पात्रता निर्माण झाली.
वाल्या कोळ्याला.. महर्षी नारद भेटले! पण.. आमची अवस्था आणखीन वाईट!! आम्ही वाल्या आहोत हेच माहिती नव्हतं. मी तर..वाल्मिकी ऋषी हि सोडा.. रामच समजत होतो स्वतःला.. तुमच्या भाषेत सांगायचं तर कॅन्सर..व पु.लं. च्या भाषेत सांगायचं तर ‘लखू रिसबूड’ कडे वाटचाल सुरु होती. त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला ऐकलं आणि वाटू लागलं.. खरंच आम्ही अभागी!!..आयुष्यातली खुप वर्षे फुकट गेली.. तुमच्यासारखं शिकवणारं कोणी आधी का भेटलं नाही!.. पार तिशीत आलो आणि तुम्ही भेटलात..
आणि अगदी परवा.. तुमची गोष्ट अचानक स्ट्राईक झाली.. तुम्हीही असेच तिशीत.. आणि काळाकुट्ट अंधार.. तुम्ही चाचपडत उभे असताना.. Mr. Kernel बॅटरी घेऊन आले आणि ‘Dennis Ritchie’ च C Programming च पुस्तक तुमच्या हातात सुपूर्द करून, अवघी दोन वाक्ये बोलुन निघुन गेले…
तुमच्या वाट्याला Kernel फक्त पाचच मिनिटे आले.. आमच्या साठी मात्र दर सोमवार,मंगळवार, बुधवार कित्येक तास तुम्ही बॅटरी घेऊन उभे असता.. ‘म्हणून आम्ही खूप भाग्यवान आहोत’…असं लिहून व्यक्त होणं थांबवायचं.. असं कुठेतरी मनात होतं..पण ‘भाग्यवान’ असं लिहिणं अचानक नकोसं वाटू लागलं..मन तयारच होत नव्हतं.. अजूनही तयार नाही आहे!!! इतक्या दिवसांच्या तुमच्या गुरुकुल संस्कारांमुळे, बहुतेक त्याला.. इतक्या वर्षांच्या सवयीप्रमाणे, भाग्यस्थाना भोवती रेंगाळण्यापेक्षा; ते ओलांडून कर्मस्थानाच्या अग्निपथावर चालण्याची कल्पना अधिक आवडू लागली आहे…
तुमचा विदयार्थी ,
सचिन प्रविण पाटील
(UNIX2020-314)
ऋणनिर्देश – येथे बऱ्याचदा आम्ही शब्द आला आहे कारण ..हा अनुभव घेताना मी एकटा नव्हतो… ‘UNIX क्लास करायचाच ! हा फायनल डिसिजन घेणारा व रात्री लेक्चर संपल्यावर, सरांनी सांगितलेल्या भन्नाट संकल्पनांवर फोनवर माझ्यासोबत तासन्तास discussion करणारा’ विजय भोसले (UNIX2020 -365) हा हि या सगळ्यात माझ्या सोबत होता.
