सौ. ज्ञानदा प्रसाद पैठणकर

सौ. ज्ञानदा प्रसाद पैठणकर ह्या प्रसाद पैठणकर ह्या विद्यार्थ्याच्या पत्नी आहेत.
प्रसादने ॲस्ट्रोमेडीकॉम्प मध्ये – UNIX 2012, WinDev 2013, RTR 2017 (RTR 1.0) – हे Courses पूर्ण केलेले आहेत. सध्या नव्यानेच सुरु झालेला “Advanced Real-Time Rendering” (ARTR) Course करत आहे.

==========================================================================================
ऑगस्ट २०२५ मध्ये डॉ. सौ. रमा विजय गोखले मॅडम ह्यांच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त त्यांची मुलाखत घेतली गेली होती. त्या मुलाखतीवर उमटलेली ही प्रतिक्रिया …
==========================================================================================

आदरणीय मॅडम,

सुरवात काय करू समजत नाही लहान तोंडी मोठा घास घेतेय. पण हिंमत करून तुमच्या साठी चार शब्द लिहितेय.
चूक भूल माफ करा.

सोपं नसतं
एका  महत्वकांकशी शिक्षका ची बायको होणं !
एखादा गजरा
बायकोला घेऊन द्यावा
एवढी समयसूचकता
असलेला नवरा
कॉम्प्युटरसमोर आणि कोडींग
मन लावून  करत बसतो !….
 
घरी सांगितलेल्या वेळेवर
कधिही न येणारा नवरा
काट्यावर काटा आल्याबरोबर
क्लास मध्ये मात्र उभा असतो !……
 
घरात सणवार असो
की पाव्हणेरावळे
आनंदाश्रमात भेटतात यांना
सगेसोयरे !
जगावेगळा माणूस असा
शांत राहून फक्त पाहाणं…
सोपं नसतंच मुळी….
अश्या महत्वकांशी शिक्षका ची बायको होणं !
 
लग्नात आपण घेतो फेरे,
एकमेकांना वचन देतो,
पुरुषार्थ सगळे करण्यासाठीच
गृहस्थ म्हणून दीक्षा घेतो !
आपण समाजाच विध्यार्थ्यांनच ऋण मानणं
हा याचा धर्म असतो,
ऐहिक प्राप्तीत अनेकदा
चार पावलं मागे असतो !
रविवारी सुद्धा काम आणि मुलांसाठी आनंदाश्रमात जाणं !
सोपं नसतंच मुळी
महत्वकांशी शिक्षकाची बायको होणं !
 
काय पाहतो आपण फार ?
साधीसुधी माणसं आणि खातंपितं घर !
निर्व्यसनीपणाची त्यात असावी भर !
घरात जरी माणसं दिसली चार,
आई, माई म्हणणाऱ्यांचा राबता असतो फार !
कोणत्याही वेळी येण होतं सरावाचं येणं !
सोपं नसतंच मुळी महत्वकांशी शिक्षकाची बायको होणं !
 
लक्ष नसतं संसारात
पण विस्तार त्याचा मोठा !
माणसांच्या श्रीमंतीचा
कधी नाही तोटा !
शिकवण्याच्या कलेत
मन तृप्त करून जातं,
सोपं नसतं महत्वकांशी शिक्षकाची बायको होणं!
 
व्यक्ती घडत जाते आणि
समाज मोठा ठरतो !
मी माझं दूर सारून
पोर घराबाहेर पडतो !
भारावलेलं जिणं त्याचं
ढगाएवढं असतं काम,
कोण म्हणेल कलीयुगात
कुठे आहे सीतेचा राम?
विचाराने भारून जातात
नसतं कसलंच भान !
पाठी उभं राहाणं त्यांच्या
एवढंच असतं आपलं काम !
सेतू भव्य बांधतात सारे
त्यात थोडं खारूताईचं देणं !
असंच असतं मुळी….
महत्वकांशी शिक्षकाची बायको होणं !
 
ही कविता माझी नाही वाचली एका ठिकाणी त्यात बदल केले आणि कालची मुलाखत ऐकून सुचत गेले.   
 
* मॅडम तुम्हाला वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा *
 
11 वर्ष झाली लग्नला भेटायचा योग नाही आला. पण खुप जुनी ओळख आहे काल हा भास झाला.
अहो (प्रसाद )आमचे थकत नाहीत. तुमच्या दोघां बद्दल सांगताना. कौतुक वाटत ते सगळं ऐकताना.
 
गुरु विषयी ची ओढ आता पर्यंत जाणवत होती. आपण तेवढीच आई (तुमच्या बद्दल)  बद्दल ची ओढ या वेळी जवळून
बघितली.
 
सर न चा शब्द प्रमाण असं  फक्त विध्यार्थी च नाही तर तुम्ही म्हणता हे काल मुलाखती मधून जाणवलं. आणि भेटण्याची
ओढ वाढवत गेलं. नुसतं ऐक असं म्हणाले होते. पण ऐकताना त्यात मीच रमून गेले  होते.
 
Coding  आणि C ह्यातलं मला काहीच समजत नाही येत नाही खरंच तर पण आता वाटत की मला पण कोणी असं
मार्गदर्शन करणार मिळालं असतं तर..
 
परवा चा कार्यक्रम खुप छान झाला ज्ञानदा पण मला वेळ नाही ग देता आला. असं ह्यांच म्हणणं मला समजलं च नाही.
पण तुमच्या मुलाखती मधून समजलं ज्ञानाच्या महासागरा समोर आपण कोणीच नाही.
 
Apple चा फोन का नाही घायायचं या वर खुप चर्चा झाली. पण हे कायम म्हणतात
सरां नी सांगितलं आहे code कर मग घे. हे फक्त वाक्य वाटायचं मला. पण प्रज्ञा नी पण  coding करून फोन कमवला ते
काल समजलं आणि हे म्हंटले ते पटलं.
 
तुमच्या सल्ल्या शिवाय निर्णय घायचा नाही ह्याची प्रचिती आली  काल आणि मन शांत झालं.
खोटं नाही बोलणार तुम्ही दोघ माहित नव्हता मला आजून पण पूर्ण माहित नाही.
 
खुप चीड चीड व्हयची ह्यांच्या वर  किती उशिरा पर्यंत कंटाळे मीं खुप वाद व्हायचे काल तुम्हाला ऐकून असं वाटलं की
आपण जे वागतोय ते किती चूक आहे. तुम्ही जे केलंय सरांन साठी त्यांच्या बरोबर  ते बघून  तर भारावून गेले आणि
उमगल आपल्याला तर काही च करावं लागत नाही आहे.
 
तुम्ही जशी सर ना साथ देत आहात तशीच जमेल मला माहित नाही प्रयत्न नक्की करेन.

काल कोणाला काय मिळाल माहित नाही मला आपण स्त्री म्हणून आपण  किती भूमिका नवऱ्याच्या आयुष्यात पार पडतो.
हे मात्र समजलं. सोपं नाही माझ्या साठी पण प्रयत्न नक्की करेन..
 
सर सगळ्यांचे च गुरु आहेतच. पण आज गृहिणी आई बायको सून मुलगी म्हणून कसं वागायचं राहायचं या साठी माझ्या
साठी तुम्ही गुरु आहात. कायम असाल.
 
खुप धन्यवाद !!!
 
लवकरच भेटायचा योग यावा आणि  तुमच्या ज्ञानाच्या महासागरा चा आनंद मला ही घेता यावा ही इच्छा !!!
 
*कृतार्थ*
सौ. ज्ञानदा प्रसाद पैठणकर.


सौ. वैदेही वि. गाजरे

सौ. वैदेही वि. गाजरे ह्या वरूण गाजरे ह्या विद्यार्थ्याच्या आई आहेत.
वरूणने ॲस्ट्रोमेडीकॉम्प मध्ये – WinDev 2020, UNIX 2020, RTR 2021 (RTR 4.0 – as student), UNIX 2022 आणि RTR 2023 (RTR 5.0 – as Group Leader) – हे Courses पूर्ण केलेले आहेत. सध्या नव्यानेच सुरु झालेला “Advanced Real-Time Rendering” (ARTR) Course करत आहे.

ॲस्ट्रोमेडीकॉम्प-
पाच सहा वर्षांपूर्वी माझा मुलगा या परिवारात सामील झाला. वेगवेगळे कोर्स, सेमिनार करत होता. एवढ्या मोठ्या कालावधीत, नकळत आम्ही कुटुंबीय पण त्या परिवारात  सामील झालो.
 
वाढदिवसाचे डेमो, डीएस डेमो, वेबजीएलचे डेमो, फायनल डेमो हे सगळे, आतापर्यंत घरी बसून बघत होतो. विविध विषयांवर असलेले डेमो, मुलांचा प्रोत्साहनपर जल्लोष, नंतर सर आणि मॅडम चं मनोगत हे कॉम्प्युटर वर बघत असतानाही  एक प्रकारची सकारात्मक, आश्वासक ऊर्जा नेहमीच जाणवत असे. ही ऊर्जा एरवी अगदी लेक्चर मध्येही जाणवत असे़!!
मात्र यावेळी दि. ४ जानेवारीला, आरटीआर ग्रुप लीडर ची पालक या नात्याने हे सगळं प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं.  हा अविस्मरणीय  अनुभव होता, यापेक्षा जास्त वर्णन नाही करता येणार.
डेमो बघत असताना, मधल्या वेळेत आजूबाजूला बसलेल्या पालकांशी बोलणं झालं. कोण कुणाचे पालक आहेत हे समजलं.  सगळ्या मुलांची नावं, ग्रुप मीटिंगमुळे गेली तीन वर्षं आम्हां पालकांच्या कानावर पडत असल्याने आपोआपच आमच्यातला परकेपणा गळून गेला आणि आम्ही फार जुनी ओळख असल्यासारखे एकमेकांशी बोलू लागलो. असे बंध निर्माण होणं हल्ली दुर्मिळ झालं आहे पण हा अनुभव ‘गुरुकुलामुळे’ मिळाला.

ॲस्ट्रोमेडीकॉम्प चं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे , या परिवारात  काही विद्यार्थी असे आहेत, ज्यांचा लिंक्डइन वरचा प्रोफाईल बघितला तर एरवी त्यांच्या समोर उभं पण रहायचं धाडस होणार नाही. पण इथे येताना ते आपल्या पदव्या, कंपनीतील पदं इतक्या सहजपणे मागे सोडून आलेले असतात, जसं देवळात जाताना माणूस आपल्या चपला देवळाबाहेर काढून मग आत जातो.  त्यामुळे इथे ही ज्येष्ठ मंडळी, दादा या नात्याने मुलांना लाभतात. त्यांची मदत, मार्गदर्शन नवीन मुलांना सर्वार्थाने मिळायला लागतं.  या निमित्ताने एक घटना मला आठवली. एक मुलगा इंटरव्ह्यू द्यायला मोठ्या कंपनीत गेला होता. अतिशय औपचारिकपणे, पुरेशा गांभीर्याने इंग्रजी भाषेत मुलाखत चालू झाली. काय काय येतं, काय कुठे शिकलास वगैरे विचारणा चालू होती. ते सांगता सांगता,  उमेदवाराने सरांकडून काय शिकला ते सांगितलं आणि जादुची कांडी फिरावी तसं झालं. कारण मुलाखत घेणारा पण सरांचा विद्यार्थी होता. औपचारिकता गळून पडून नंतर ते दोघे एकमेकांशी मराठीत कधी बोलायला लागले हे त्यांनाही कळलं नाही. ही ताकद इथल्या बंधुभावाची आहे, इथे तयार होणाऱ्या घट्ट नात्याची आहे.

ॲस्ट्रोमेडीकॉम्पच्या गुरुकुलात विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर बद्दलचं ज्ञान मिळतंच.  पण इथलं प्रशिक्षण हे एका अर्थाने सैनिकी प्रशिक्षणाएवढंच खडतर वाटतं मला(शारीरिक प्रशिक्षण वगळता).
आरटीआर करणं हे विद्यार्थ्यांचं पहिलं प्राधान्यच असलं पाहिजे हा आग्रह असतो सरांचा. त्यामुळे त्या काळात घरी कोणत्याही प्रकारच्या अडचणी, आजारपणं (स्वतः ची/घरातल्यांची), लग्नं, जन्म, मृत्यू काहीही झालं तरीही सरांच्या, मॅडम च्या प्रोत्साहन/धाकामुळे, असाईनमेंट्स वेळेत पूर्ण करण्यासाठी मुलं जीवाची पराकाष्ठा करतात. डेमो पूर्ण होण्याआधी तर किती रात्रींच्या कोजागिरी होतात ते न मोजणंच बरं. या सगळ्या प्रक्रियेत  मुलांमध्ये चिकाटी, जिद्द, सातत्य, समर्पणाची भावना, कष्टाळूपणा,  दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीत पाळणे, अभ्यासू वृत्ती जोपासणे, एकमेकांना मदत करणे या अशा अनेक गुणांची जोपासना नकळत होते.
” Be cruel with yourself” आणि “मेलात तर भूत बनून या लेक्चरला.” या सरांच्या शब्दांतच येतं सगळं आणि मग मुलं आमूलाग्र बदलतात.

“एका बीजापोटी तरू कोटी, कोटी जन्म घेती सुमने फळे” या प्रमाणे सरांनी रुजवलेल्या संस्कारांमुळे, दिलेल्या ज्ञानामुळे;  शिक्षकी पेशाचं महत्त्व आणि पावित्र्य मुलांच्या लक्षात येतं. त्यातून किती तरी विद्यार्थांमधून शिक्षक घडले.  सरांची कन्या जिचं नावंच “प्रज्ञा” आहे ती पण आता शिक्षक झाली आहे.
सरांनी जाणीवपूर्वक पासपोर्ट काढला नसला तरी सरांचे बरेच विद्यार्थी, जगभरातील विविध देशांमध्ये नामांकित कंपन्यांत कार्यरत आहेत. “ज्ञान मिळवण्यासाठी शिका, अर्थार्जनासाठी शिकू नका.” ही सरांची शिकवण.  ज्ञानामुळेच तुम्हांला अर्थ आणि आदर दोन्ही मिळेल असं सर नेहमी म्हणतात आणि स्वतः च्याच उदाहरणाने त्यांनी ते सिद्धही करून दाखवलं आहे.

ॲस्ट्रोमेडिकॉम्प मध्ये –
तुम्हांला संस्कार, जीवन मूल्यं आणि ज्ञान मिळतं ज्यामुळे तुमची कुंडली काही प्रमाणात तरी बदलून तुमची प्रगती होते.
या परिवाराचे सदस्य झाल्यामुळे, वैद्यकीय क्षेत्रातील काही मार्गदर्शन आवश्यक असल्यास, सरांकडून तेही मिळू शकतं.
आणि
शेवटी ज्ञानाच्या बाबतीत तर असं आहे की, “देणा-याचे हात हजारो दुबळी माझी झोळी”. ज्ञानगंगेचा प्रवाह अखंड वाहतोय.
ही ज्ञानगंगा, भविष्यात शतधारांनी नव्हे सहस्र धारांनी वहात रहावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏🙏

– सौ. वैदेही वि. गाजरे. 


यश राजेश सावळकर

UNIX 2022, RTR 2023

प. पू. श्री गोखले सर आणि मॅडम 

शिरसाष्टांग  नमस्कार,
 
माझे नाव यश राजेश सावळकर  आणि मी RTR ५.० कॉम्प्युट ग्रूप चा सदस्य आहे. माझ्याकडुन काहिही चुकीचे लिहिण्यात आले असेल तर माफी असावी. हे लिहिण्याचे कारण म्हणजे, बरेच दिवसांपासून  एक इच्छा होती की आपण एक शिक्षक बनायला हवे म्हणून, मी जानेवारी २०२३ पासुन माझी लहान बहीण जी नुकतीच पुण्यात अभियांत्रिकी करायला आली होती, तिला मी C लँग्वेज आणि फंडामेंटल्स शिकवायला लागलो. जानेवारी २०२३ मध्ये जेव्हा मी सरांचा फंडामेंटल्स चा सेमिनार केला तेव्हा सरांची शिकवण्याची पद्धत आणि कंटेंट बघून मी अक्षरशः फिदा झालेलो. मी त्याच सेमिनार चा कंटेंट(सीपीयू व्यतिरिक्त) सुद्धा तिला शिकवला जो तिलाही खूप आवडला..
 
यावर्षी गुढी पाडव्‍या ला मी माझ्या एका कॉलेजच्‍या मॅम ला कॉल केला आणि त्यांना म्हणालो की “कॉलेज मधल्या विद्यार्थ्यांना संगणकाच्या मूलभूत संकल्पना शिकवण्याची संधी मला मिळू शकते का?” तर त्या म्हणाल्या की आम्ही नक्कीच बोलवू, पण तेव्हा मुलांची एंड सेमिस्टर परीक्षा सुरु होती म्हणून त्या म्हणाल्या की आम्हि तुला पुढच्या सेमिस्टर मध्ये बोलवू. त्यामुळे मी जरा नाराज झालो पण जस मॅडम म्हणतात की “प्रत्येक गोष्ट काही ना काही कारणा साठी होते” आता माझा पण त्याच्यावर नितांत विश्वास बसला आहे, शंभर टक्के खरं आहे ते. मी त्यांना या वेळी पुन्हा संपर्क केला तेव्हा त्या हो म्हणाल्या आणि सेशन साठी १४ ऑक्टोबर हा दिवस ठरला. मी सेशन साठी त्यांच्याकडे ४ तासांची वेळ मागितली पण काही कारणांमुळे त्या तितका वेळ मला देऊ शकल्या नाही आणि साहजिकच होतं.  कदाचित त्यांना पण वाटत असेल की ह्याला आज पर्यंत कुठे शिकवण्याचा अनुभव नाही आणि तेही एवढ्या विद्यार्थ्यां समोर!  म्‍हणून, त्यांनी मला कसा बसा दीड तासाचा वेळ दिला.
 
आणि तो दिवस आला “१४ ऑक्टोबर”. त्याच्‍या आधीच्या रात्री एखादं लहान मूल ज्या उत्साहाने दिवाळी किंवा वाढदिवसासाठी नवीन कपडे घेतं अगदी त्याच उत्साहाने मी पण नवीन कपडे आणि एक ऑफिस बॅग घेतली. सकाळी १० वाजता  प्रोग्रेसिव एज्युकेशन सोसायटी चे मॉडर्न कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी विभागात पोहचलो. माझ्या कडून तिथल्या मॅडमना पण जास्त काही अपेक्षा नव्हत्या आणि त्यात काहीच चूकीचे ही नाही. मी सेमिनार हॉल मध्ये गेलो त्यांनी माझा सत्कार केला आणि मग मी बोलायला सुरवात केली.त्या क्षणी मी थोडा भावूक झालो कारण मी कॉलेज मध्ये असताना मला याच सेमिनार हॉल मधून बाहेर काढलं होतं आणि आज त्याच सेमिनार हॉल मध्ये उभा राहून मी शिकवणार होतो . अभियांत्रिकी च्या द्वितीय व तृतीय वर्षाचे मिळून अंदाजे ६५-७० विद्यार्थी उपस्थित होते. सत्राच्या सुरवातीलाच विद्यार्थ्यांना या गोष्टीची हमी दिली की मी तुमच्या ह्या दीड तासाचा कचरा नाही होऊ देणार आणि समजा तुमच्यापैकी एका मुलाने सुद्धा कंटाळुन मोबाईल  बाहेर काढला तर ह्या सत्रा मध्ये मी अनुत्तीर्ण झालो. मी त्यांना संगितलं की मी एक “बॅक बेंचर” होतो आणि जवळजवळ प्रत्येक सेमिस्टर मध्ये माझे काही विषय बॅक (नापास) होते म्हणून काळजी करू नका मला पूर्ण कल्पना आहे की जेव्हा समोरचा बोलत राहतो आणि आपल्याला कंटाळा येत असतो तेव्हा आपण काय करतो.
 
मी सत्राची सुरवात १ byte हे ८ bits का आहेत हे सांगून केली, स्टोरेज डिव्‍हाइसेस मध्‍ये हार्ड डिस्क आणि थोडं फार रॅम बद्दल सांगितल, वेबसाइट स्लो का आहे आणि   बीजीएमआय(pubg) फास्ट का आहे , C मध्ये कॅरॅक्टर १ byte चा आणि जावा मधे तेच कॅरॅक्टर २ byte चा का आहे ते सांगितलं. मी त्यांना म्हणालो की जर तुम्हाला माझं शिकवणं आवडलं असेल तर तुम्ही तुमच्या मॅडमना मला पुन्हा बोलावण्याची विनंती करा. शेवटी त्यांचा साठी OpenGL FFP मध्ये  एक छोटासा डेमो बनवला होता तो त्यांना दाखवला. दीड तास सगळ्यांच लक्ष फक्त माझ्याकडे होत आणि कोणालाही आपला मोबाईल बघावा अशी इच्छा सुद्धा झाली नाही.
 
सत्र संपल्यावर मला तिथल्या एका मॅडम नी विचारले देखील की “अरे यश! तू एवढं कधी शिकलास?” कॉलेज मध्ये असताना मी त्याच मॅडम चा एक नावडता विद्यार्थी होतो.पण शेवटी, आज मला माझ्या टाळ्या भेटल्याच.
 
बाहेर निघाल्यावार २०-२५ मुलांनी मला गाठलं आणि माझ्याशी बोलायला लागले.  त्यांच्याकडे माझ्यासाठी बरेच प्रश्न होते .त्यांनी खूप चांगल्या प्रतिक्रियाही दिल्या. एवढच नाही तर पुढे होऊन त्यांनी मला त्यांच्या कॉलेजच्या टेक्निकल कम्युनिटी मध्ये समाविष्ट होऊन शिकवण्याची विनंती केली.
 
मी ज्‍या मॅडमना सत्रासाठी वेळ देण्याची विनंती केली होती त्यांचे मनापासुन आभार मानले. त्या मला म्हणाल्या की सगळ्यांना सत्र आवडलं आणि ते अजून एका सत्रा साठी आग्रह करत आहेत. मला काही मुलांचे मेसेज पण आले की त्यांना माझ्याकडुन शिकण्याची इच्छा आहे.
 
माझ्या आयुष्यातला एक सगळ्यात सुंदर दिवस होता हा.
 
मी सरांना मनापसून धन्यवाद म्हणू इच्छितो कारण सरांमुळेच ही  गोष्ट शक्य झाली . सर जसं म्हणतात की शिकवण्यामुळे खूप आदर आणि कीर्ती भेटते त्याची आज अनुभूती आली. मॅडम आणि प्रज्ञा मॅडम ला पण मनापासून धन्यवाद कारण तुम्ही ज्या छोट्या छोट्या गोष्टी शिकावता त्यामुळे जो मोठा बदल घडतो ते शब्दात सांगणं शक्यच नाही, ते फक्त अनुभवता येऊ शकतं. आणि last but not the least माझी group leader ऋतु चौगुले हीने पण मला नेहमी शिकवण्यासाठी प्रोत्साहित केले म्हणून तिचे पण मन:पूर्वक आभार 🙂. 
 
धन्यवाद … 🙏
 
आपला ऋणी,
 
यश राजेश सावळकर


अमित बसवेश्वर हैलकर

UNIX 2012, RTR 2020

Art of Learning by Doing….

‘RTR’  हा शब्द माझ्या आयुष्यात आला १२ एप्रिल २०२० या दिवशी, त्याआधी मला RTR म्हणजे काय तेही माहिती नव्हते, ना मी कधी programming केले होते. तरीही या RTR ने मला म्हणजेच या batch मधील विद्यार्थ्यांना काय दिलं ते बघूयात. RTR चा full form आहे Real Time Rendering, Full form माहिती होण्यापासून या प्रवासाची सुरुवात होते आणि ही सुरुवात आपल्याला एका अद्वितीय अशा विश्वात घेऊन जाते. या प्रवासामध्ये आपण काय शिकतो..? आपण शिकतो Core Graphics Programming. खरंतर Graphics Programming हे by-product आहे. आपण शिकतो ते म्हणजे Programming कसं करायचं, त्यानंतर शिकतो कि चांगलं Programming कसं करायचं, तसंच एखादी गोष्ट एकदाच पूर्णपणे शिकली तर तीच गोष्ट दुसऱ्या एखाद्या ठिकाणी शिकणे कसे सोपे जाते यातली गंमत आपण अनुभवतो. Computer च्याच भाषेत सांगायचं झालं तर, Windows मध्ये शिकलेला concept Linux मध्ये कसा असतो तोच Android किंवा macOS कसा असतो. या एकाच कोर्समध्ये आपण शिकतो Windows, Linux, Android, WebGL, macOS, iOS आणि DirectX. या सगळ्या गोष्टींचे मूळ Concepts आपण शिकतो आणि या सगळ्या technologies मध्ये आपण code हि करतो. Graphics हेच या कोर्स चं माध्यम असल्यामुळे इथे आपल्यामध्ये Artistic View develop होण्याच्या दृष्टीने आपल्याला Sketching पण शिकवलं जाते. खरंतर Sketching हा खूप मोठा topic झाला, त्यापेक्षाही साध्या आणि सोप्या अशा गोल काढण्यापासून याची सुरुवात होते, पुढे याच गोलातून आपण smiley वगैरे काढतो  आणि याच basics shapes मधून पुढे OpenGL मध्ये सगळे राडे  केले जातात. Sketching सुरु झालेला प्रवास पुढे अगदी 3D modelling, Lighting Models आणि एकंदरीतच सगळीकडे Artistic दृष्टिकोनातून कसे पहावे इथपर्यंत पोहोचतो. हा view आपल्याला आणखी समजण्यासाठी सर आपल्याला, चित्रपट कसे आणि कोणते पहावे, संगीत कसं ऐकावं, कसं समजून घ्यावं, पुस्तके कोणती आणि कशी वाचायची हेसुद्धा शिकवतात. या सर्व programming शिकण्याच्या process मध्ये आपण पण फक्त programming च करायला शिकतो असं नाही तर केलेल्या program ची प्रत्येक line अन line आपल्याला सरांनी समजून सांगितलेली असते, तसेच एखादी गोष्ट त्याच्या खोलात जाऊन शिकणे म्हणजे काय असते, हा अनुभव आपल्याला या course मध्ये मिळतो.

आपण programming हे Graphics च्या माध्यमातून शिकत असल्यामुळे, आपण केलेले programs पाहणाऱ्यालाही Enjoyable असतात. आपण ‘C’ सारख्या विषयाची सुरुवात त्यातल्या अगदी Variable Declaration सारख्या अतिशय basic step पासून करतो ते थेट अगदी DirectX च्या Geometry Shader पर्यंत आपली सफर घडते.

या क्लासमध्ये आपल्याला आणखीन काय मिळतं.. फक्त प्रचंड नव्हे तर महाप्रचंड knowledge. आपण दीड वर्षात जेवढा code करतो तेवढा एक हाती code क्वचितच कोणत्या कंपनीत होत असेल कारण कंपन्यांमध्ये शक्यतो libraries किंवा wrappers चा वापरत केला जात असल्यामुळे, तिथे तसाही कमीच code लिहावा लागत असेल.

या ज्ञानाव्यतिरिक्त, आपण मिळवतो, टाळ्या आणि स्वनिर्मितीचा आनंद.. कधीकधी तर संपूर्ण program नीट करूनही आपल्यासमोर screen वर येतो तो फक्त अंधार आणि अंधार.. आणि असा अंधार आपल्याला जे काही शिकवतो ना ते म्हणजे खलास असतं. याच अंधारातून आपल्या डोक्यात जो प्रकाश पडतो, तो प्रकाश पुढे कायम आपल्याला सोबत करणार असतो..

या क्लास मध्ये आपण संपूर्ण दीड वर्ष सरांच्या सानिध्यात राहतो, त्यामुळे या संपूर्ण दीड वर्षात आपल्याला एक सर्वात महत्वाची गोष्ट मिळते ती म्हणजे Live Motivation. आजकाल Youtube किंवा इतर social media platforms वर Motivate करण्याचा trend आहे, तिथे कोणीही – कोणालाही motivate करत असते, पण ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीच्याही थोडेसे पुढे जाऊन ‘आधी खूप-खूप केले आणि मग सांगितले’ यानुसार वागणाऱ्या सरांकडून दीड वर्ष Motivation मिळत राहणे हि खरोखर अलौकिक – अमूल्य गोष्ट आहे.

या दीड वर्षात आपल्याला सरांकडून मिळतात ‘असंख्य शिव्या’ (माझ्यासारखे काहीजण तर या एकाच कारणासाठी क्लास ला येतात, ज्याचं घोषवाक्य आहे “सरांकडून शिव्या खाणे हा आमचा ‘कर्मसिद्ध’ हक्क आहे”.) पण या शिव्या आपल्याला आयुष्यभरासाठी अमुलाग्र बदलतात.

दिड वर्षात या संपूर्ण क्लासमध्ये आपण एकाच विषयात खोलवर अभ्यास कसा करायचा हे शिकतो. एखाद्या विषयात बुडून जाणं हे कसं असतं याचा अनुभव आपण घेतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ‘शिकणं’ शिकतो. आपण हे वाचलेले अथवा ऐकलेले आहे की ‘माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो, त्याने आयुष्यभर शिकत राहिले पाहिजे’ या ठिकाणी आपण ‘शिकणं शिकतो’ म्हणजेच ‘जगणं शिकतो’.

हे सगळं आपल्याला शिकवण्यासाठी सर त्यांचा घाम आणि रक्त ओतत असतात आणि हे शिकत असताना आपण पण दोन गोष्टी द्यायच्या असतात त्या म्हणजे – श्रद्धा आणि सबुरी

तसं बघितलं तर Real Time Rendering या शब्दापासून सुरू झालेला प्रवास, जेव्हा क्लास संपतो तेव्हा कोणासाठी तो Road to Richness असा झालेला असतो, कोणासाठी तो Road to Receive किंवा Road to Rejuvenate अथवा कोणासाठी तो Road to Rest in peace असाही झालेला असू शकतो.

१२ एप्रिल २०२० ला जेंव्हा हा क्लास सुरु झाला तेंव्हा सरांनी सांगितलं होतं, की OpenGL नावाचा हा एक यज्ञ मी आज सुरु करतो आहे आहे आणि या यज्ञामध्ये तुम्हाला आहूती द्यायची आहे, तुमच्या आळसाची, तुमच्या अज्ञानाची आणि तुमच्या नाकर्तेपणाची.. या दीड वर्ष मध्ये या यज्ञामध्ये ज्यांनी या गोष्टींची आहूती दिली त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडला तर काहीजण मात्र स्व:ताच या यज्ञात आहूती म्हणून पडले असावेत…. असो यातला उपहास आपण सोडून देऊ पण दीड वर्षांनंतर जेव्हा हा यज्ञ पार पडतो, तेव्हा जो विद्यार्थी तयार होतो तो चांगला programmer तर झालेला असतोच पण सरांनी दिलेल्या motivation आणि guidance मुळे तो एक चांगला माणूस म्हणूनही घडलेला असतो आणि आजच्या कॉर्पोरेट जगात या विद्यार्थ्याची value काय आणि किती आहे, हे आपल्या विद्यार्थ्यांना job हे ज्या कंपन्यांमध्ये मिळतात ना त्यांची नावे पहिलीत कि ते आपोआप लक्षात येते.त्यातली महत्वाची नावे आहेत Sony, nVidia, AMD, Qualcomm, त्यानंतर Arm, intel, Philipps. या कंपन्यांमध्ये आपले विद्यार्थी हे Graphics मध्येच काम करतात, एवढेच कशाला nVidia सारख्या core Graphics कंपनीच्या CUDA samples ची GIT Repository आपला RTR 3 चा विद्यार्थी आणि RTR 4 चा Group Leader ऋत्विक चौगुले हा own करतो. हे झालं फक्त job संदर्भात, आपल्या RTR च्या विद्यार्थ्यांच्या ज्या Start Ups कंपन्या आहेत Like Void Star India, Per Pixel, या कंपन्यांशी Sony सारख्या MNCs फक्त Graphics Project साठी Tie-up करताहेत आणि त्यांना मानाने बोलावताहेत. हे घडतंय ते फक्त या सगळ्यांनी RTR ला विद्यार्थी आणि Group Leader म्हणून घेतलेल्या कष्टांमुळे. हि आहे RTR ची ताकद जी आता हळूहळू सगळ्या जगाला समजायला लागली आहे.

विद्यार्थ्यांमध्ये झालेला बदल जसा या कंपन्यांमध्ये त्यांना मिळणाऱ्या job आणि Tie-ups वरून दिसतो तसाच तो आणखी एका ठिकाणी पण दिसतो, तो बदल पहायचा असेल तर आपल्या विद्यार्थ्यांचे सोशल मीडिया वरचे About me किंवा तिथे त्यांनी ठेवलेले Status अथवा quotes पहा.. तिथे दिसेल You know nothing, Do one thing at a time and do it Good किंवा Entering into Void. एवढंच नाही तर विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या कंपन्यांची नावे सुद्धा या बदलाची पावती देत आहेत.

एका वाक्यात सांगायचं झालं तर ‘You know’ म्हणत आलेला विद्यार्थी  ‘I don’t know’ असं म्हणत आता ‘गुरुकुलातील विद्यार्थी’ झालेला असतो. त्याची या technology वर, त्याच्या machine वर ‘नितांत श्रद्धा’ तयार झाली असते. त्याच्यासाठी त्याचं machine म्हणजे सचिन ची Bat झालेली असते, पंडित हरिप्रसादजींना जेवढा आदर त्यांच्या बासरीविषयी वाटतो, तेवढाच आदर त्याला या क्षेत्राविषयी वाटायला लागतो, तर पंडित शिवकुमार शर्मा ज्या नजाकतीने संतूर वाजवतात त्याच नजाकतीने तो programming करायचा प्रयत्न करतो..

आणि माझ्या मते शेवटचा मुद्दा जो VIMP नव्हे तर VVIMP आहे (VVIMP च्या खाली 27 Underlines) आणि तो  म्हणजे,

RTR केलेल्या विद्यार्थ्याला आयुष्यात “वेळेची किंमत” कळालेली असते….

धन्यवाद सर…

 

अमित बसवेश्वर हैलकर

(RTR2020-026)


चिन्मय दीक्षित

UNIX 2020 (Online Batch), WinDev 2021 (Online Batch)
 
गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा 
सर आणि मॅडम तुम्हाला कोटी कोटी प्रणाम  !! 
 
माझ्या कडे इतकी शब्दसंपदा  नाही की मी तुमच्या करता काही लिहू शकेन, पण माझ्या भावना आणि माझा भाव तुमच्या पर्यंत पोहोचावा म्हणून मी हे धारिष्ट्य करतो आहे, काही चुकले तर माफ करा 🙏🙏
 
गाऊ गुनन कैसे तुम्हरो
गुन नाहि मोमे !! 
गुनीदास गुनदान मांगत है प्रानपिया
तुम गुनसागर हो , गुन समुद्र 
गुनवंत जिया !! 🙏🙏
 
मला आजही तो दिवस आठवतोय जेव्हा माझ्या कडे नशीबाने सरांचं एक युनिक्सच ऑडिओ रेकॉर्डिंग आलं, आपोआप ते ‘सतत क्रिया’ ऐकलं आणि मग युनिक्सला ऍडमिशन घायची ठरवली.
‘Bach’ (बाक) चा तो पहिला दिवस, रात्री 9 चा ऑनलाइन क्लास आणि एक प्रकारची उत्सुकता !!
इतके दिवस ज्यांना मी ऐकत होतो त्यांना *लाइव* ऐकणार,  बघणार होतो !
 
आणि सर समोर आले , एक प्रकारचे चैतन्य अनुभवले !! 
हाच तो गुरूचा सहवास. सर परंपरे बद्दल बोलत होते आणि जाणवलं पूर्वीची गुरुकुल परंपरा होती ती या पेक्षा काय वेगळी असणार?
 
जशी क्लास ची lectures होत होती , तशी प्रत्येक दिवशी  माझ्या भोवतीची आवरणं गळून पडायला सुरुवात झाली. Sword can kill one at a time but words can kill many at a time .. हे वाक्य तर कोरून घ्यावं वाटलं, किती सहज बडबड करतो आपण हे समजलं. 
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ !, 
*you know* चा भोपळा 
आणि *IT* मध्ये  चालत असलेल्या poor practices *copy paste* attitude, समोर कोड चालतोय ना येड्या मग समजून काय करायचय ! 
ह्या सगळ्या गोष्टी मला समजत होत्या, खूप दिवस निद्रा अवस्थेतून बाहेर येत असतानाचा फील येत होता. 
किती सोपं होत होतं सगळंच ,
*जे कराल ते पॅशनने करा* 
*प्रत्येक नि प्रत्येक वाक्य म्हणजे अमृत वचन !!*
 
सांगितीक तालीम घेत असल्यामुळे तिथे तानपुऱ्याला दिलेला मान आपोआपच इथे कॉम्पुटर , माउस , ऑपरेटिंग सिस्टिम वापरताना येऊ लागला, पहिलं धड operating system चा End User तरी बनुया ठरवलं , फुलफॉर्म माहीत केल्यावर शॉर्ट फॉर्म वापरणे हे चालू केलं , आपोआप विकिपीडिया चा बुकमार्क ब्राउझर वर आला ,तिथे जाऊन terminology oriented study करायचं ठरवलं. 
 
सगळ्यात मोठा भ्रम दूर झाला तो म्हणजे *मला हे येतं* 
वास्तविक हे असं कधीच नसतं , चालू आहे शिकतो आहे ही एक unending process की जी infinite loop सारखी चालू राहिली पाहिजे ! 
माझ्याच resume वरती proficient knowledge मध्ये  C/C++ पाहिलं आणि स्वतःचीच लाज वाटली, आणि सरांच्या भाषेत *आपण कुठून आलो…* हे वाक्य आठवलं .
 
हे अनुभवत असताना त्या *कॅन्सर* पासून सर आपली मुक्तता करण्याकरीता आले आहेत हे समजत होते आणि एक positive approach आयुष्यात येऊ लागला. आपल्या पैश्यावर आपलं अश्रू,  स्वेद आणि रक्त असलं पाहिजे, talk is cheap show me the code हा attitude यायला हवा . आपलं नाणं खणखणीत वाजलं पाहिजे हे समजू लागले. 
Technology बद्दलचा आदर वाढत होता, जमिनीवर येत होतो आणि आपल्याला लायकी पेक्षा जास्त मिळत आहे हे समजत होतं.
माझं प्रलोभनांमागे पळणं थांबलं, ह्याची बूम त्याची बूम ची सरांनी केलेली थट्टा यातून जणू त्या हिरव्या दिव्यातून मला सर पाहु शकत आहेत आणि माझ्या मनात चालू असलेलं वाचू शकत आहेत असा फील आला. 
 
सरांची गोष्ट ऐकताना त्यांचा तो प्रवास समजून घेताना आपण किती *किडा मुंगी* आहोत आणि किती लहान सहान गोष्टीना आपण achievement म्हणतो आणि किती छोट्या गोष्टीमुळे आपण negative विचार मनात आणतो हे उमजल.
आज ही जेव्हा मन खिन्न होत तेव्हा *तो* प्रवास मी आठवतो.
 
*अग्निपथ कविता जेव्हा सरांकडून ऐकली , नटसम्राट नाटका मधलं ते स्वगत ऐकलं तेव्हा फक्त निःशब्द आणि भरून येत होतं !*
सर आयुर्वेद, कॉम्प्युटर, ज्योतिष आणि संस्कृत मधले श्लोक हे सगळं relate करून विषय शिकवत होते आणि Knowledge is interrelated म्हणजे काय, ह्याचा उलगडा मला होत होता. त्यांचं ते अवघडाला सोपं करून समजावणं आणि माझ्यासारख्या प्रत्येक विद्यार्थ्यांला जोवर समजत नाही तोवर तितक्याच पोटतिडकीने समजावणं ,
हे सगळं आम्हाला किती सहज मिळत होतं🙏🙏
Fundamental शिकत असताना आपण BE आहोत आणि उन्नती अधोगती करून पास झालो ह्याची जाणीव झाली.
खर सांगतो त्यादिवशी  “पुरश्या फुकट हो” हे चितळे मास्तरांच वाक्य आठवलं .
 
प्रत्येक आणि प्रत्येक वाक्य ऐकत असताना आपण किती खुजे आहोत आणि हा सगळा डोलारा कधी उन्मळून पडेल याचा नेम नाही. सर म्हणतात *इट्स नेव्हर टू लेट* तेच एक आधार देत होतं आणि अभ्यास चालू करायचा ठरवलं, 
मी पुढे किती प्रगती करू शकेन हे माहीत नाही पण इतकं नक्कीच की सरांनी दिलेली शिकवण आणि त्यांनीच दिलेला मार्ग हे मला इष्ट स्थळी पोहोचवेल हा दृढ विश्वास मात्र नक्कीच आहे. सगळं सोडून अभ्यास करावा हा प्रश्न खूप दिवस त्रास देत होता पण एका lecture ला सरांनीच उत्तर दिलं,
पाण्याचा  प्रवाह खूप जोरात येत असताना त्याला तोंड न देता हळू हळू diagonally  पार करायचं आणि योग्य ठिकाण येईपर्यंत तो प्रयास अव्याहत सुरू ठेवायचा ! 
किती सोपं केलंत सर तुम्ही !! 
आपल्या वर असलेल्या जबाबदारीची जाणीवही करून दिलीत आणि त्यातून बाहेर कसं पडता येईल याचा मार्गही दाखवलात.
 
बाहेर गाता यावं म्हणून गुरुंच नाव लावायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट असते, आज सरांच नाव बाहेर सांगता यावं त्या करता भरपूर रियाज करावा लागणार हे मात्र नक्की , ते करत रहाणार , tie mentality तो सगळा भंपकपणा, काय चूक आणि काय बरोबर हे ओळखण्याची दृष्टी 
हे सगळं सगळं तुम्हीच दिलत सर 🙏
गाण्या आधी भरपूर ऐकलं पाहिजे हे म्हणजे ऍडव्हान्स करण्या आधी बेसिक कर लेका , कॉपी पेस्ट, आतपाव फुल्लस्टॅक ह्या सगळ्या मधून योग्य ते निवडण्याची दृष्टी तुम्ही दिलीत.
खरच मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आज madam आणि तुम्ही माझ्या आयुष्यात आलात.
 
कर्नल मोड मध्ये मला  हात धरुन बॅटरीच्या प्रकाशात योग्य ठिकाणी घेऊन जाणार ह्यावर निर्धास्त पणे जगणारा …………………………….
…तुमचा किडा मुंगी विद्यार्थी !
 
 
गुरुकृपा ही केवलम् 
 
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙌🙌🙌🙌🙌🙌
 
 
– चिन्मय दीक्षित


अनुप पंडित

UNIX 2020 (Online Batch)

सर तुम्ही online आल्यामुळेच शक्य झालं….

 

आदरणीय सर साष्टांग नमस्कार,

मी Feb-DAC2010 sunbeam ला होतो. त्या व्यतिरिक्त पुण्यात कधीही राहिलो नाही. पण तेव्हापासून तुमची batch attend करायची इच्छा होती. ती केवळ तुम्ही online आल्यामुळेच शक्य झाली.
 
गमतीची गोष्ट म्हणजे class सुरू होण्यापूर्वी घरात चर्चा सुरू होती, मि म्हणालो “sunbeam मध्ये रांगायला शिकलो… तो अजुनही रांगतोच आहे… म्हणुन क्लास करायचा म्हणजे सर हात धरून चालायला शिकवतील”. पण जसजसा class पुढे जात गेला तेव्हा कळायला लागले की रांगण तर दूरच पण सध्या कड पलटायला सुध्दा जमत नाही आणि होता होता योगेश्वर सरांच्या class नंतर कळले की अरे… आपला तर जन्म सुध्दा व्हायचा आहे… मग इतके दिवस जे झाले त्याला काय म्हणायचे…???   तर “गर्भ संस्कार”.
 
खरंच सर खुप काही शिकायला मिळालं. तुमच्याकडे बघुन “निष्काम कर्मयोग” काय असेल ते बघायला मिळते.
 
तुमचा शिक्षणासाठी शिक्षण हा आग्रह. यावरून श्री गोंदलेकर महाराजांच वाक्य आठवत की ” मी इथे नामाचा बाजार मांडला पण सगळे हिंग जिऱ्याचेच गिऱ्हाईक… कोणी खरा केसर कस्तुरीचा चाहता मिळाला तर मी त्याच सोन करील”. त्याप्रमाणे तुम्हीपण सांगता की पैसा मिळवण्यासाठी तर सगळेच शिकतात पण शिक्षणासाठी शिक्षण घेणारा विरळाच…. खर आहे सर तुम्ही सांगितलेल्या Cancer च्या defination मधला मी सुद्धा एक आहे.पण शिक्षणासाठी शिक्षण ही काय मजा आहे याचा अनुभव घेण्याची इच्छा आहे आणि ती तुमच्याकडून मिळत असलेल्या प्रेरणेनेच शक्य होईल.
 
Online शिकवताना तुम्हाला त्रास झाला असेल सर…पण माझ्यासारख्यासाठी ही एक संधीच होती…. संधी आहे.
 
व्यक्त होण्यासारखं खूप काही आहे सर….
 
पण पुन्हा एकदा तुम्ही online आल्याबद्दल खुप खुप धन्यवाद….!!!!
 
तुमचाच,
एक टिंब टिंब
UNIX2020-501


सचिन प्रविण पाटील 

UNIX 2020 (Online Batch)
 
Note by Team AstroMediComp: This is the First Expression Ever which is also available in the “Audio” form. Kindly listen to its audio to understand the feelings of the writer in his own voice.
 
Listen to the Audio Version Here:

 
 

UNIX

|| श्री ||

नमस्कार सर ,

           तसं तर UNIX चा क्लास अजून पूर्ण झालेला नाही. पण राहावतच नाही, म्हणून लिहितो आहे. क्लास सुरु होताना हि कल्पना होतीच, कि हा विषय खूप चांगल्या प्रकारे शिकायला मिळणार आहे. पण चार chapters  संपेपर्यंतच जो थक्क करणारा अनुभव आला, त्याने व्यक्त होण्यास भाग पाडलं.

          सर! UNIX सिस्टिम च्या माध्यमातून तुम्ही आमची Belief सिस्टिमच हादरवून टाकलीत. एव्हडे दिवस माळ्यावरच्या बॉक्स मध्ये धूळ खात पडलेलं Bach चे पुस्तक, मला एखाद्या अद्वैत ज्ञानाने भरलेल्या ग्रंथासारखे दिसू लागले. आणि या ग्रंथाचा आधार घेऊन, तुम्ही आयुष्याचा अर्थही समजावत आहात; हे उमगू लागले. UNIX शिकण्यासाठी जी फीस आहे, ती तर कमी आहेच.. पण UNIX शिकवता शिकवता तुम्ही जे आयुष्य शिकवताय, त्याची किंम्मत कुबेराचे नऊ च्या नऊ खजिने ओतले तरी करता येणार नाही.

          UNIX शिकताना असं कधी वाटलंच नाही, की आपण एखादा अवघड व तांत्रिक विषय शिकत आहोत. प्रत्येक लेक्चर  म्हणजे एखाद्या सुंदर कलाकृतीचा आस्वाद घेण्याचा एक अनुभव होता. आणि ही कलाकृती सर्वांचा विचार करून बांधलेली होती. जस की एका lecture ला file व process बद्दल सांगताना, तुम्ही जशी सांख्य तत्वज्ञान, प्रकृती-पुरुष अशी आध्यात्मिक उदाहरणे दिलीत. त्याचवेळी पंखा व वीज यांसारखी घरगुती उदाहरणेही हटकून दिलीत. 

          प्रत्येक थरातील विद्यार्थ्याला मनात ठेवून तुम्ही शिकवत होतात.. आणि आमच्या मनात आलेले, अथवा पुढे येऊ शकणारे असे सर्व प्रश्न, तुम्ही स्वतःच निर्माण करून त्यांचं निराकरण करू लागलात. विद्यार्थ्यांचा एव्हडा विचार करणारे शिक्षक; आणि त्यात कहर म्हणजे वेगवेगळ्या पातळीवरचे विद्यार्थी काय विचार करतील हा हि विचार करून शिकवणारे शिक्षक… हे सगळं स्वप्नवत होतं.

         UNIX शिकताना जे घडत गेलं त्याचा कधी विचार केला नव्हता.. अद्भुत !!

           ” ठेविले अनंते तैसेचि रहावे| चित्ती असू द्यावे समाधान |” या संत तुकारामांच्या अभंगाचा अर्थ ‘getblk’ नावाचा अल्गोरिथम शिकताना कळला. त्यावेळी ‘अंगावर काटा येणे’ हा शब्दप्रयोग हि कमी वाटला मला. अष्टसात्विक भाव वगैरे जागं होण्यासारखं काहीतरी होतं ते. आणि मग असे अनुभव, ही नेहमीचीच गोष्ट होऊन गेले.  

          ‘User Mode’ व ‘Kernel Mode’ शिकवताना तुम्ही जी वातावरण निर्मिती केलीत… ‘थेटर मधला तो अंधार’,  ‘बॅटरी घेऊन उभा असणारा वाटाड्या’,  आणि त्यात तुमचं ते नटसम्राट मधील स्वगत… “अनिकेत ईश्वराला मिळालं घर!”… खरंच शब्द नाहीत सर…”त्यावेळी तुम्ही नक्की कोण होतात?”… इतक्या प्रभावीपणे कलाकृती बांधणारे दिग्दर्शक?… ती तितक्याच आर्तपणे मांडणारे अभिनेते?… त्यातला गहन अर्थ पोटतिडकीने समजावणारे शिक्षक?.. तुम्ही त्यावेळी या सगळ्यांच्या पलीकडे होतात!!.. तुम्ही त्यावेळी देव होतात!!!.. नव्हे नव्हे तर त्याहूनही श्रेष्ठ…गुरु!!!!

          गुरुगीतेतही श्री शंकराने देवाहून श्रेष्ठ अधिकार गुरूंना दिला आहे.त्यामुळे तुम्ही UNIX सिस्टिम व Bach ग्रंथाला तुमच्याहून श्रेष्ठ मानत असलात, तरी आमच्यासाठी त्याहून कित्येक पटीने श्रेष्ठ तुम्ही आहात. कारण तुम्ही नसतात तर हा दैवी विषय आम्हाला कधीच समजला नसता. दासबोधात समर्थ रामदास म्हणतात…

सद्वस्तु दाखवी सद्गुरू | सकळ सारासार विचारू | परब्रम्हाचा निर्धारू | अंतरी बाणे ||

फोडुनी शब्दांचे अंतर | वस्तु दाखवी निजसार | तोचि गुरु माहेर | अनाथांचे ||

         UNIX सिस्टिम हि सद्वस्तु, अगदी त्यातले बारकावे उलगडून तुम्ही अशी समजवायला घेतलीत की परब्रम्ह (Kernel) चा न्याय.. त्याचं प्रयोजन हे अंतरी बिंबवलं गेलं.. आणि यासाठी तुम्हाला जे शब्दांचे अंतर फोडावे लागले ( Reading between the lines in Bach ) ते आम्हाला आयुष्यात कधी उलगडले नसते. 

         UNIX बद्दल सांगावं तेव्हड कमीच आहे..त्यामुळे आता आयुष्याबद्दल तुम्ही जे शिकवलत, त्या बद्दल थोडसं सांगतो. अगदी पहिल्या दिवशी, तुमची गोष्ट सुरु झाली तेव्हापासुनच हे बहुमोल शिक्षण सुरु झालं. तुम्ही ‘connecting the dots by looking backward’ बद्दल सांगितलत सर, व तुम्ही सांगितलेले concepts मनन करत, असेच dots connect करत गेलो… आणि आयुष्यातील अनेक न सुटलेली गणिते, या सूत्रांनी सुटत गेली. तुम्ही अगदी सहजपणे म्हणुन गेलेली वाक्ये, तुकाराम महाराजांनी वाटलेल्या परिसांसारखी अमूल्य होती.. घरी जाऊन, लोखंडावर घासुन पाहिल्यावरच त्यांची किंम्मत कळेल अशी! यातली आत्ता आठवणारी दोन उदाहरणे सांगतो.

          ‘अधिक कष्ट, अधिक पैसा’ हे प्रमाण तुम्ही सांगितलत.. आणि ‘प्रत्येक गोष्टीला तिचा वेळ दिला पाहिजे,no shortcuts’ हे तत्व तुम्ही शिकवलत. आवड म्हणुन गेली पाच-सहा वर्षे ज्योतिष शास्त्राचे अध्ययन करताना, कुठल्याच पुस्तकात किंवा व्हिडीओ मध्ये मला ‘शनी’ ग्रहाबद्दल जे कळू शकलं नाही; ते मला या एका वाक्यावर मनन करताना कळलं.

          आणि बरोबर याच्या उलट.. तुम्ही कॅन्सर ची व्याख्या सांगितलीत.. आणि खूप हादरलो!.. पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटलं!!.. कारण ह्याच मार्गावरून नकळतपणे, थोडा का होइना.. पण चालू लागलो होतो. आणि मग यातून.. ज्योतिष शास्त्रातील ‘राहू’ ग्रह व कॅन्सर च relation अधिक उलगडत गेलं. राहुला pressure cooker चा कारक का मानतात ते कळलं. ‘कमी कष्ट, कमी वेळ..आणि जास्त शिजवणे’.. आणि मग समुद्रमंथना नंतरची राहूची गोष्ट अशी कळली कि आधी कधीच कळली नव्हती..अमृत वाटपाची गोष्ट..!!

          ..खूप कष्ट करुन, Proper behavior आणि discipline सांभाळून, आयुष्यभर राहिलेल्या deserving लोकांना जे अमृत वाटलं जाणार होतं; ते राहूला कमी कष्टात, काहीही follow न करता shortcut ने हवं होतं. पण तो, ते पचवू शकला नाही…कॅन्सर!! अशा सर्व लिंक लागत गेल्या. आणि ‘अमृत सेविताच पावला | मृत्य राहो |’ या समर्थ रामदासांच्या ओवीचा, पहिल्यांदा उलगडा झाला.

          ही फक्त दोनच उदाहरणे सांगितली..ती योगायोगाने ज्योतिषा संबंधीत होती. पण सर, आणखी बऱ्याच क्षेत्रात अनेक गोष्टी उमगत गेल्या. आयुष्यात आपण नक्की कुठे चुकलो.. काय चुकलो.. आणि आता काय केलं पाहिजे याची clarity आली. तुमची ‘Terminology oriented study’ , ‘concentration व consistency चा मिलाफ’ ही व अशी आणखी सूत्रे आज पर्यंत कधीच कोणी समजावल्या नाहीत अशा  अत्यावश्यक basic techniques  समजावून गेली.

          आणि ‘Knowledge is interrelated’ हा तर त्यावरचा कळसच!! बलराज सहानी, अमिताभ बच्चन यांचे डायलॉग्स.. कुसुमाग्रज, पु.ल. यांसारखे साहित्यिक.. गदिमा, साहिर यांची गीते.. मॅट्रिक्स, इक्विलिब्रियम इत्यादी चित्रपट.. आणि आणखीन बरंच काही.. असं प्रत्येक जण मग UNIX शिकवू लागलं.. प्रोग्रामिंग करणं म्हणजेच ‘ढाचे से कहानी बनाना’.. ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ म्हणजेच ‘Talk is cheap, show me your code’. असं सगळं एकमेकात गुंफलेलं ज्ञान समजून घेण्याची पात्रता निर्माण झाली.

          वाल्या कोळ्याला.. महर्षी नारद भेटले! पण.. आमची अवस्था आणखीन वाईट!! आम्ही वाल्या आहोत हेच माहिती नव्हतं. मी तर..वाल्मिकी ऋषी हि सोडा.. रामच समजत होतो स्वतःला.. तुमच्या भाषेत सांगायचं तर कॅन्सर..व पु.लं. च्या भाषेत सांगायचं तर ‘लखू रिसबूड’ कडे वाटचाल सुरु होती. त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला ऐकलं आणि वाटू लागलं.. खरंच आम्ही अभागी!!..आयुष्यातली खुप वर्षे फुकट गेली.. तुमच्यासारखं शिकवणारं कोणी आधी का भेटलं नाही!.. पार तिशीत आलो आणि तुम्ही भेटलात..

          आणि अगदी परवा.. तुमची गोष्ट अचानक स्ट्राईक झाली.. तुम्हीही असेच तिशीत.. आणि काळाकुट्ट अंधार.. तुम्ही चाचपडत उभे असताना.. Mr. Kernel बॅटरी घेऊन आले आणि ‘Dennis Ritchie’ च C Programming च पुस्तक तुमच्या हातात सुपूर्द करून, अवघी दोन वाक्ये बोलुन निघुन गेले…

          तुमच्या वाट्याला Kernel फक्त पाचच मिनिटे आले.. आमच्या साठी मात्र दर सोमवार,मंगळवार, बुधवार कित्येक तास तुम्ही बॅटरी घेऊन उभे असता.. ‘म्हणून आम्ही खूप भाग्यवान आहोत’…असं लिहून व्यक्त होणं थांबवायचं.. असं कुठेतरी मनात होतं..पण ‘भाग्यवान’ असं लिहिणं अचानक नकोसं वाटू लागलं..मन तयारच होत नव्हतं.. अजूनही तयार नाही आहे!!! इतक्या दिवसांच्या तुमच्या गुरुकुल संस्कारांमुळे, बहुतेक त्याला.. इतक्या वर्षांच्या सवयीप्रमाणे, भाग्यस्थाना भोवती रेंगाळण्यापेक्षा; ते ओलांडून कर्मस्थानाच्या अग्निपथावर चालण्याची कल्पना अधिक आवडू लागली आहे…

तुमचा विदयार्थी ,

सचिन प्रविण पाटील

(UNIX2020-314)

 

ऋणनिर्देश –  येथे बऱ्याचदा आम्ही शब्द आला आहे कारण ..हा अनुभव घेताना मी एकटा नव्हतो… ‘UNIX क्लास करायचाच !  हा फायनल डिसिजन घेणारा व रात्री लेक्चर संपल्यावर, सरांनी सांगितलेल्या भन्नाट संकल्पनांवर फोनवर माझ्यासोबत तासन्तास discussion करणारा’  विजय भोसले (UNIX2020 -365) हा हि या सगळ्यात माझ्या सोबत होता. 


Onkar Mate

 
UNIX 2020 (Online Batch)
 

UNIX ची बॅटरी आणि जीवनदर्शन

 
सर आणि मॅडम
साष्टांग नमस्कार,
 
सर, ३ फेब्रुवारी २०२१ रात्री ११:३० ला getblk algorithm झाला आणि
अंगावर काटा काढलातच (२७ Underline)
झोप तर उडवलीच… 
आणि डोळ्यातून पाणी पण काढलत.
 
Unix सारखा दैवी विषय, बॅटरी सारखी simple उदाहरणं देत, knowledge is interrelated हे सिद्ध करत , “You know” वाल्याना चिमटे घेत आयुष्य शिकवण्याची तुमची पद्धत…. थक्क करून टाकते.
 
Ken Thompson, Dennis Ritchie, Brian Kernighan ह्या आधुनिक ऋषींनी जगाला कलाटणी दिलेली OS, दैवी ठरते.
Great people do simple things simply.
पण माझ्यासाठी, Great OS simplify करून शिकवणारे दैवी ठरतात.
 
तुमच्या Knowledge is interrelated या वाक्याचा प्रभाव इतका झाला आहे की अंतर्मनाला relate करायचा जणू छंदच लागला आहे.
त्यातून आयुष्यातले dots connect व्हायला लागले आहेत.
 
आयुष्यातील काही अप्रिय गोष्टींमुळे, हे असं का? असे बरेच प्रश्न मला पडायचे ज्याची उत्तर माझ्या पालकांकडेही नव्हती. मनोबल वाढवण्यासाठी मी motivational books, thoughts , अध्यात्मिक पुस्तक वाचायला लागलो. माझ्या बुद्धिनुसार त्याचे अर्थ लावले (चूक बरोबर माहीत नाही) त्यातले  छान छान वाक्य एका डायरी मध्ये टिपून ठेवली.
 
Buffer cache च्या lecture मुळे त्यातील reading between the lines समजले.
 
काही लोक प्रयत्नांना सर्वस्व मानतात 
“प्रयत्नांती परमेश्वर “, 
“तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” etc.
 
 
काही लोक नशिबाला/प्रारब्ध ला सर्वस्व मानतात
यात आळशी लोक पण आले आणि प्रयत्न करून थकलेले आणि शेवटी नशीब म्हणणारे पण आले
 
आळशी लोकांनी corrupt केलेलं तुकाराम महाराज यांचं वाक्य आठवतं
“ठेविले अनंते तैसेचि राहावे चित्ती असू द्यावे समाधान”
 
यात प्रयत्न की प्रारब्ध नक्की कशावर विश्वास ठेवावा नक्की कोण superior या कित्येक वर्ष माझ्या मनात चाललेल्या द्वंद्वाला पूर्णविराम मिळाला. Period.
 
आपलं आयुष्य एक process आहे हे समजलं.
तुकाराम महाराज kernel mode बद्दल बोलतायत असं लक्षात आलं.
kernel ने जसे ठेविले तैसेचि समाधानाने sleep मध्ये राहावे आणि मग continue(कर्म/प्रयत्न) करावे.
 
सुमित्रा भावे यांच्या ‘नितळ’  चित्रपटात विजय तेंडुलकर यांचा dialogue हा  user mode आणि kernel mode यांचं सह-अस्तित्व अधोरेखित करतो.
नियती आणि इच्छाशक्ती यांचा प्रवास जोडीने होतो…”
आयुष्याचा output काढायला इच्छेचा user program आणि नियतीचा kernel दोन्ही महत्वाचे.
 
Kernel runs in the context of process
भगवंत भक्तांच्या माध्यमातून जगतो.
अशी तुमची एकावर एक वाक्य ऐकताना अंगावर काटा आणणे हे  function recursive execute होताना वाटत होतं(काट्यावर काटा).
 
वडीलधारी माणसं सांगतात,
तुमच्या कष्टातून तुम्ही बरंच काही साध्य करू शकता , परंतु आयुष्यातले कलाटणी देणारे महत्वाचे क्षण , काही अप्रिय गोष्टी,वैगुण्य  हे तुमच्या हातात नसतात ते विधी लिखित असतात
 
इथे विधी लिखित म्हणजे kernel चा code जो process ला follow करावाच लागतो तो कितीही आपटलं तरी नाही बदलणार
हे असं सगळं मनात उमटलं.
 
 
श्री गोंदवलेकर महाराजांनी साधकाला केलेला एक उपदेश Unix मुळे सोपा झाला
यत्न कसून करीन मी , यश दे रामा
न दे तुझी सत्ता , राम हा सर्वथा कर्ता
 
यत्न कसून करीन मी ,
(user mode मधले सगळे कष्ट जे तुमच्या हातात आहेत ते करा)
यश(buffer) दे रामा, 
(यशासाठी प्रार्थना system call करा)
न दे तुझी(kernel) सत्ता ,
(यश (buffer) लगेच मिळेल याची guarantee नाही, ते kernel च्या सत्तेत आहे)
राम(kernel) हा सर्वथा कर्ता
 
हे असे सारे dots जेंव्हा connect झाले तेंव्हा त्या आनंदामुळे नाचावस वाटलं
 
भक्ताने आर्ततेने हाक मारली की भगवंत हाकेला साद देणारच
I requested for ANY free buffer but kernel gave me
GEOPBYTE sized buffer of Dr.Vijay Gokhle…
 
 
जेंव्हा अपयश येत (buffer मिळत नाही), दुःखी, निरुत्साही वाटत असतं तेंव्हा स्वतःचा मनोबल वाढवण्यासाठी एक शब्द getblk algorithm ने दिला
 
Continue (कर्म करत राहा)
भगवान(kernel) के घर देर है पर अंधेर नही (जिते रहो काम करते रहो)
इतका common शब्द पण त्यामागचा इतका मोठा अर्थ तुमच्यामुळे समजला.
 
बॅटरी च्या उदाहरणातुन तुम्ही kernel समजून 
सांगत असता , पण खरं तर Unix ची बॅटरी घेऊन आमचा हात धरून तुम्ही जीवनदर्शन घडवत असता.
 
आपल्या सारखे गुरू लाभल्यामुळे , ज्ञानाच्या दारिद्र्य रेषेखालील माझ्या सारखे सुदामे समृद्ध होऊन ‘आनंदा‘ने ‘आश्रमा‘तून बाहेर पडत राहतील.
 
तुमचा नम्र विद्यार्थी,
ओंकार मते
 
(ता.क. – माझ्या आयुष्यात तुम्हाला आणणारे माझे वरिष्ठ आणि तुमचे विद्यार्थी श्री. उत्तेज पाटील यांचा मी सदैव ऋणी राहीन)


Anagh Bajpai

UNIX 2019, RTR 2020, WinDev 2020,

युनिक्स डिझाइन शिकणे म्हणजे आयुष्य शिकणे – self-realization

Respected Sir,

Just a couple of days back I was having a conversation with my mother and father about rebirth and संचित कर्म.

My parents as they always say, said that “मनुष्य का प्रारब्ध उसके पूर्व जन्म के संचित कर्मों द्वारा निर्मित होता है, मनुष्य स्वयं के कर्मों से अपने प्रारब्ध को बदल सकता है पर अगर मनुष्य सचेत नहीं है तो वो इस कर्मों के चक्र में घूमता रहता है और 84 लाख योनियों में फिरता रहता है | “

Now me being as naïve as I am, said that.

“हमें इस जन्म में अपने कर्मों को इस तरीके से करना चाहिए कि कोई संचित कर्म मृत्यु के बाद न रहे और हमारी आत्मा खाली हाथ परमात्मा के पास जाए |
अब अगर ईश्वर को हमें वापस मृत्यु लोक में भेजना ही होगा तो ठीक है कम से कम हमारे प्रारब्ध में कुछ पुराना तो नहीं लिखा होगा, और हम इस जन्म में अपने नए कर्मों से अपना प्रारब्ध लिखेंगे|”

Just after saying this, आपके शब्द ध्यान में आए की “UNIX System Design शिकणे म्हणजे आयुष्य शिकणे “.

And I just thought as soon as a Computer system is powered on its life starts and it is alive until powered off.

As a system administrator and as a programmer it is our duty with every keystroke to keep in mind that we do not do something malicious, same as we do not have to do anything malicious in our life or it will one way or another reflect in this life or next.

I will surely keep this in mind from now onwards.

After this thought came to my mind I was smiling for a while because of two reasons.

1) How ignorant I am that after a year of studying UNIX from you, I now realized this.
2) And just before I am planning to learn UNIX again from you this thought came to my mind.

सर मेरा मानना है की सत्संग विवेक को जन्म देता है |
विवेक चिंतन को |
चिंतन ही हमारे विचारों को नया आयाम देता है |
विचार ही शब्दों के रूप में मुख से बाहर आते हैं |
शब्द से ही क्रिया बन जाती है |
क्रिया से आदत |
आदत से चरित्र |
और चरित्र से प्रारब्ध |

गोस्वामी तुलसीदास जी ने ‘रामचरितमानस ‘में लिखा भी है – बिनु सत्संग विवेक न होई। रामकृपा बिनु सुलभ न सोई ।।

सत्संग मिलना आसान नहीं, अगर शिक्षक अच्छा है तो एक विद्यार्थी के शिक्षक का शिक्षण ही उसके लिए सत्संग है |

सर आपका शिक्षण सत्संग है और सत्संग आज नहीं तो कल आत्मज्ञान की शुरुआत करा ही देता है , बस कोई सत्संग को जीवन से जाने न दे, यानि की आपके शिक्षण को याद रखे |

Thank you sir for teaching in such a manner that people like me are able to understand life and Computers in the same way, and also in the way they are supposed to be learned.

चरण स्पर्श
Anagh Bajpai


मोहित धर्माधिकारी

UNIX 2019, WinDev 2020 (Online Batch)

|| श्री ||

गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः

 

प. पू. श्री गोखले सर आणि मॅडम साष्टांग प्रणाम,

 

आपल्या क्लास बद्दल किंवा सरांबद्दलचे भाव ( हो कारण भाव आणि भावना ह्या मध्ये खूप फरक आहे. एकाबद्दल भावना तयार होणे हे परिस्थितीजन्य असल्यामुळे ती तात्पुरती असल्याची शक्यता दाट असते, नव्हे ती असतेच २७ underline आणि भाव हा शाश्वत स्वरूपाचा असतो कारण तुमची नुसती शिकवण्याची नाहीच तर विद्यार्थ्याला घडवण्याची असलेली तळमळ) शब्दात मांडणे हे खरे तर माझ्यासाठी खूप अवघड असणार, कारण मुळात काही मांडणी करण्यासाठी वाचन, मनन आणि चिंतन या सर्व गोष्टींचा संबंध असणे खूप महत्वाचे असते आणि या सर्वांचा आणि माझा दूर दूर  पर्यंत संबंध नाही.

माझ्या भाग्याने लहानपणी पासून घरातील वातावरण तसे गुरु परंपरेतील असल्यामुळे म्हणा किंवा आई वडिलांच्या धाकामुळे नकळत काही संत चरित्र वाचण्याचे पुण्य पदरी पडले असावे आणि त्यात गुरुपौर्णिमा ही कॅटॅलीस्ट म्हणून का होईना त्यामुळे ही शब्दसेवा गुंफण्याचा प्रयत्न करतोय.

खरं तर शब्दपूजा हा योग्य शब्द आहे पण ते म्हणण्यासाठी पूजेचा संबंध असावा लागतो आणि त्यात परत मग संकल्प आला आणि सध्या फक्त बाकच (OS) व्यवस्थित (? अरे मोहित तुला आरपार म्हणायचे आहे का इति बायको) केल्यामुळे, कीर्तनाचा आणि वाती वळणे हे माझ्या सद्य परिस्तिथीचे वर्णन आहे हे तुम्हाला न सांगता पण कळणार आहेच. तसा doer होण्याचा प्रयत्न सुरु केला आहे आणि SDK च्या बॅचला ऍडमिशन घेतली आहेच.

ऑगस्ट २००६ ला Sunbeam कराडच्या DAC ला ऍडमिशन पासून, मी माझ्या BE इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलेकॉम्म्युनिकेशनच्या (न सांगता येणारी डिग्री! ) ज्ञानाच्या (?) धक्यातून सावरत नाही तेंव्हाच क्लासच्या नोटीस बोर्ड वर एक सूचना लागते, ती तुमच्या पहिलं lecture ची आणि तेही रात्री १२:३० ते २:३०. आणि मग तुमच्या व प्रशांत लाड सरांच्या नावाने आम्ही शंख वाजवतो. ( आता १२ वर्षाचा पुणेरी भाषेचा अनुभव त्यामुळे डिसेन्ट लिहायला जमतंय ) पण तेंव्हा खरं तर आपण म्हटल्याप्रमाणे संगीतात आम्ही टिम्ब टिम्ब बोलून गेलो. कृपया त्याचा मनात राग मानू नये आणि आज त्या अपराधाची क्षमा मागतो. कदाचित त्यावेळच्या DAC कोर्स च्या schedule (सकाळी ७ ते रात्री १२ हो तेच ते ऑपेरेशन Successful  patient डेड) च्या अवधानामुळे हा एक घोर अपराध नकळत घडून गेला.

पण त्यानंतर सुरु झालेला एक चित्त थरारक आणि मंत्रमुग्ध होणारा प्रवास! dx / dt (डेरीवेटीव्हस) काय, exponential काय त्याचा आणि मायक्रोप्रोसेसर (up म्हटलं तर तुम्ही लॅपटॉप मधून येऊन तलवार चालवलं तर) चा आणि त्याचा संबंध काय. मधेच नर्तकी येऊन raw device ड्राइवर आणि fine grained device ड्राइवर चे झालेले ज्ञान आणि मधेच “सोचलो ठाकूर” म्हणून विद्यार्थ्यांचे आत्ताच्या दशेच्या वास्स्तवाचा आरसा दाखविणारा तिखट संदेश .NET ची १३ कारणे आणि .NET च्या प्रोग्रॅमचे execution आणि  CLR ( कॉमन language runtime ) चे  लोंडींगचा शेवटचा क्लास झाल्यानंतरची धन्यता! आणि तुम्हाला कराड वरून निरोप देतानांचे पाणावलेले डोळे! 

आणि त्यानंतर पेटून उठलेला मी (?) (झुंजूमुंजु का होईना ), तेंव्हा  Java  नीट कळले नव्हते पण तुम्ही सांगितलेले खालिद मुघल DAC चा schedule पूर्ण करून रात्री १ ते ३.३० वाचन करण्याचा ध्यास घेतला आणि ७ दिवसात पूर्ण केले. तुम्ही सांगितलेले CLR ( सर याच्या आधी फुल्ल फॉर्म लिहिला आहे ) चे loading, प्लेसमेंट साठी तयारी करत असलेल्या माझ्या batch च्या सर्व विद्यार्थाना शिकवले आणि ते आजही लक्षात आहे!

परंतु BE मध्ये झालेलं YD चा इतिहास कपाळावरचा पुसल्या जात नव्हता. सत्यम, HSBC , जॉन डिअर आणि सिग्मा या सर्वांचे interview crack करून पण HR मध्ये मार्कशीट दगा देत होती. परंतु तुमच्या प्रेरणेनें SNS ( सर फुल्ल फॉर्म नाही आहे) आत्ताची ForgeAhead  ने Java ची subjective टेस्ट घेतली आणि तब्बल ४२ interview नंतर ऑफर लेटर हातात आले.

त्यानंतर इच्छा असूनही म्हणा तर कधी कंपनीच्या कामाच्या वेळेमुळे म्हणा ( खरं तर हातात येणाऱ्या छम छम  मुळे) क्लास लावता आला नाही. परंतु बिद्युत सोबत कराड ला मॉक interview साठी जाताना मनात एक चपराक बसत होतीच. पुढे ऑस्ट्रेलिया ला जाण्याची संधी मिळाली आणि २०१४ ते २०१९ जवळपास ५ वर्षे कामाचा छान अनुभव आला. बाकीचं जरी सगळे सोडले, परंतु तिथे तुमच्या कामाची आणि मेहनतीची कदर होते. मॅनेजर हा तुम्हाला विचारून क्लायंट सोबत गोष्टी फायनल करतो आणि तिथे कोणी तुमचा क्रेडिट खात नाही. हा माझा अनुभव होता. असो असेही असले तरी मूळ उद्देश हा पैसा आणि कर्ज फेडून येणे. If you dont love your job, take home loan, You know! .(सर You know वाले पण हे एक्स्प्रेशन वाचतील तर त्यांना पण थोडं बर वाटेल) 

पेरेंट्स मुळे पण परतीचे प्रयत्न सुरु होतेच आणि RTR च्या एका youtube वरील कार्यक्रमाने मनाचा परत एकदा वेध घेतला. श्रेणिक सोबत व्हाट्सअँप आणि ई-मेल वरून यूनिक्स च्या dates ची माहिती घेत होतोच. ७ डिसेंबरला २०१९ बरोबर सकाळी १० वाजता पुण्यात पोहोचलो आणि यूनिक्स ची ऍडमिशन फायनल झाली.

जणू काही १२ वर्षांच्या एक कॅन्सरमय (हो, तो असतो आपल्याला कळत नाही यूनिक्स ला येई पर्यंत ) तपश्चर्ये नंतर ती संधी मिळाली होती. अरे मोहित तू तर .Net मध्ये काम करतो मग यूनिक्स करून काय फायदा? (इति अतिपरिचयात अवज्ञा). मग मला DevOps कडे जायचा आहे अशी कधी वेळ मारून उत्तर देणे किंवा .Net core ला कामी येईल असे सांगून त्यांच्या प्रश्नाचे समाधान व्हावे. ५ वर्षे on-site  नंतर पुण्यात कार चालवणे हे किती किचकट आहे हे पण शिकलो. १० तास जॉब करून यूनिक्स अटेंड करणे ते पण मिड-life क्रायसिस असताना तसा टिकाव लागणे कठीण आहे हे स्पष्ट दिसत होतं. परंतु तो सगळा थकवा एकदा का तुम्ही आनंदाश्रमात पाऊल टाकलं कि कुठे पळून जायचा त्याचा थांग पत्ता पण लागत नव्हता. असा धरी छंद | जेणे तुटतील रे भवबंध ||

 

आनंदाश्रमातलं वातावरण, तिथली स्पंदन आणि विद्यार्थ्यांवर तिथे घडणारे संस्कार या सगळ्यांच्या तिहेरी मिश्रणा मध्ये आपल्यातला मनात कुठे तरी साठलेला अहंकार, अनुभवाची ताठरता आणि ऑन साईट रिटर्न चा गर्व सर्व विरून जातो. गुरु ऐसा सुरमा | नख शीख मारे पूर | बाहर घाव दिसत नई | अंदर चकनाचूर ||

 मग त्याची जागा गुरुकुलातील विद्यार्थी घेतो , मेहनत, रक्त आणि घाम यांच्यावर परत विश्वास बसायला सुरवात होते आणि अभ्यासात, शिकण्यात आणि जाणण्यात काय समाधान आपल्याला मिळतेय ते आपल्यालाच कळत ,उमगत. येथोनि आनंदु रे आनंदु. आणि मग ये दिल कि बात है मुरली इसे सिर्फ दिलवाले ही समझ सकते है याचा अनुभव यायला लागतो (एक्सपेरियन्स! Mr. वॉटसन )

आणि जेंव्हा आम्ही सगळे विध्यार्थी एका लयीत येतो ( कोण कुठल्या बॅकग्राऊंडचा आहे, कुणाला किती अनुभव आहे हा फरक तिथे उरत नाही ) तेंव्हा पुन्हा सुरु होतो परत एक मंत्रमुग्ध आणि मनाला समाधान देणारा प्रवास!

हार्ट बीट मधून कळणार OS बूटिंग, रिअल मोड, प्रोटेक्टड मोड आणि अ२० द्वार , थिएटर मधील बॅटरी वाला कर्नल , पोळी भाजी आणि इडली सांबर मधून कळणार buffer cache , लाल हिरवे आणि पिवळे दिव्यामधून व्यक्त होणारी प्रोसेस , लाल आणि हिरव्या दोऱ्यावरून उकलत जाणार iNode चे डेटा structure .  गर्भधारणेतून कळणारी प्रोसेस ची life सायकल आणि इव्हेंट मधून समजणारे सिग्नल. च्यायला ९ वा चॅप्टर (इति गुह्यतमम शास्त्रं!) लय घाण ( परत भेटूच repeater म्हणून! )

सर आपण टेकनॉलॉजि मधील असे प्रॉडक्ट झालात की जे कॉम्पुटर मधील एक मानांकन (स्टॅंडर्ड) झाले आहे आणि या स्टॅंडर्ड मधून बाहेर निघणारे प्रॉडक्ट ( प्रज्ञा, योगेश्वर सर , पियुष सर, शशी सर, सोनाली मॅडम, जितेंद्र सर आणि योगेश सर, श्रेणिक, निहारा )  हे पण एक स्टॅंडर्ड म्हणून आज आपलेच कार्य पुढे चालवत आहेत .

संत रामदास स्वामींनी सांगितल्या प्रमाणे, शिष्यास गुरुत्व प्राप्त होये | सुवर्णे सुवर्ण करिता नये || किंवा as per सेंट मॉरीस बाक Unix is a Product which later become standard. It became such a standard whose product later become स्टॅंडर्ड.

Knowledge is Inter-releated.

व्यक्त होण्यासारखं बरंच आहे, सांगण्यासारख खूप आहे पण हा सांगण्याचा विषय नसून अनुभवण्याचा आणि जाणण्याचा मार्ग आहे. हे सगळे व्यक्त होत असताना माझ्या हातून नकळत चुका झाल्या असतील नव्हे असाव्यातच पण मी ही सेवा केवळ एक लेखणी म्हणून करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु याचे प्राकट्य माझ्या जवळचे काही नसून सरांच्या सिद्ध वाणीतून आलेले आहेत, त्यामुळे सुज्ञ वाचकांनी झालेल्या चुका पोटात घेऊन हे बोबडे बोल स्वीकारावे अशी प्रार्थना करून लेखणीस विराम देतो.

 

सर, मॅडम आणि सर्व विद्यार्थाना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. :pray: :pray: :pray:

 

                                              आपलाच सदैव ऋणी,

                                              मोहित धर्माधिकारी.

 

किमत्र बहुनोक्तेन शास्त्रकोटि शतेन दुर्लभा चित्त विश्रान्तिः विना गुरुकृपां परम्